पुणे : पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या पाषाण-सुस खिंड भागातील उड्डाणपुलाचे लोकार्पण आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. चंद्रकांत पाटील यांना कार्यक्रम सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. हवामान वाईट असल्यामुळे आपल्याला मुंबईहून पुण्याला येता येणार नाही, असा निरोप शिंदेंनी दिल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. त्यामुळे पाषाण सुस खिंड पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडला. पाटील म्हणाले, नॅशनल हायवे क्रमांक ४ जोडणारा हा उड्डाणपूल तयार झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. त्यांनी मला फोनवरून सुचवलं की तूच हा कार्यक्रम सोहळ्याचे उदघाटन कर. उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार भिमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेशजी बीडकर, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
''पुणे महापालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर त्रिमूर्तीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली. हिंजवडी या भागात आयटी कंपनी आहेत. दिवसभरात हजारो लोकांना प्रवास करावा लागतो. चांदणी चौकातील ६ पदरी उड्डाणपूल झाल्यावर वाहतुकीचे सर्व प्रश्न सुटतील. पुणे शहर वाढत चालले आहे. पुण्यात पायाभूत सुविधांमध्ये येणारे पूल, उड्डाणपूल, कचरा समस्या सोडवता येतील. पुणे हे शांत शहर आहे, त्याचा विकास मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमातून सांडपाणी, कचरा, पाणी समस्या लवकरच सुटणार आहेत. तर मेट्रो आणि उड्डाणपुलाची कामे लवकरच पार पडतील. जगभरातून पुणे शहरात लोक येतील असं शहर आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन विकाससाठी प्रयत्न करायला हवेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.''