पुणे: कर्जबाजारीपणाला कंटाळून व शेती मालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातील शेतक-यांचे आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मात्र,शेतक-यांनी आत्महत्येचा विचार करू नये, यासाठी येत्या १ मे पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ‘मी आत्महत्या करणार नाही तर मी लढणार’या अभियानाला सुरूवात करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दोन दिवस देहू येथे पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील माजी खासदार सुबोध मोहिते यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षात प्रवेश केला असून रविकांत तुपकर यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले. शेट्टी म्हणाले,मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या धुळे जिल्ह्यातील गावापासून अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. राज्यातील ११ जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार असून ९ मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात या अभियामाची सांगता होईल. गावोगावी जाऊन शेतक-यांना विश्वासात घेतले जाईल.कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आत्महत्या करून नये,असे आवाहन या अभियानातून करण्यात येईल. खासगी सावकारासह शेतक-याचे सर्व कर्ज एक रक्कमी माफ करून शेतक-यांचा सात-बारा कोरा करावा. तसेच शेतक-याला दीडपट हमीभाव मिळावा यासाठी येत्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनावेळी दोन विधेयके स्वत: संसदेत सादर करणार आहे. त्यास देशातील ३२ हून अधिक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे येत्या १ मे रोजी होणा-या गाव सभेत या विधेयकांना पाठिंबा देण्याचे ठराव केले जाणार आहेत. हे ठराव लोकसभा व राज्यसभेच्या सभापतीना पाठविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे येत्या १० मे रोजी १८५७ बंडाला १६१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने किसान सभेतर्फे राबविल्या जाणा-या अभियानाचा भाग म्हणून हजारो शेतक-यांच्या स्वाक्ष-या घेतल्या जातील. तसेच या स्वाक्ष-यांसह लोकसभेत शेतकरी कर्जमाफी व हमीभाव विषयक मांडल्या जाणा-या विधेयकास मंजूरी मिळावी,यासाठी दबाव टाकणार आहे.
‘मी आत्महत्या करणार नाही तर मी लढणार’ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १ मेपासून अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 8:42 PM
कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आत्महत्या करून नये, असे आवाहन या अभियानातून करण्यात येईल.
ठळक मुद्देराज्यातील ११ जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार, धर्मा पाटील यांच्या गावापासून सुरूवात