बारामती : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा काय निकाल लागतो, याकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली. 'धनुष्यबाण' हे चिन्ह आणि 'शिवसेना' हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्काच आहे. अशातच सध्या जे काही धनुष्यबाणचा वाद सुरू आहे यामध्ये मी पडणार नाही. त्यावर मी स्पष्टपणे सांगितले आहे, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्याच्या राजकिय परिस्थितीवर भाष्य केले.
शिवसेनेचे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यावरून राज्यातील राजकिय परिस्थिती ढवळून निघाली आहे. या वादात आपण पडणार नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौºया बाबत बोलताना पवार म्हणाले, सहकार परिषदेच्या समारंभासाठी ते पुण्यात आले होते. सहकार परिषदेचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. याबाबत आमच्यात मतभेद नाहीत. धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे आज योग्य वाटले.
शिवेसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले होते. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा एक गट. या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर आयोगाने अखेर निकाल दिला. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे. शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.