लक्ष्मण मोरे
पुणे : “मी ९१ वर्षांचा झालो म्हणून गप्प बसणार नाही आणि तरुणांना गप्प बसू देणार नाही. तरुणांचे भविष्य सद्यःस्थितीत स्पष्ट दिसत नाही. देशातील राजकारण्यांकडून फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही. तरुणांना प्रशिक्षित आणि प्रेरित करण्याची मोहीम हाती घेणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी केले.
डॉ. आढाव यांनी मंगळवारी (दि. १) नव्वदी ओलांडून ९१ व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. “कोरोनाने रोजच्या जगण्यातले प्रश्न दुय्यम बनवले आहेत. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. देशात तरुणांची संख्या मोठी असताना त्यांना त्यांचे भविष्य स्पष्ट दिसत नाही. जे शिकले आहेत ते परदेशात जायचा विचार करताहेत,” अशी चिंता या वेळी बाबांनी व्यक्त केली.
“कोरोनाच्या संकटाने भारताला सावध केले आहे. अशी संकटे आता वारंवार येणार हे लक्षात घेऊन प्रशिक्षित तरुणांची फळी उभी करावी लागेल,” असे बाबा म्हणाले. राजकारण्यांकडून फार अपेक्षा राहिलेल्या नाहीत. काँग्रेसपासून सर्वच राजकीय पक्ष मूल्ये आणि संकल्प विसरले आहेत. तरुणच या देशात बदल घडवू शकतील, असे म्हणत त्यांनी तरुणाईला साद घातली. जातीय, धर्मीय, प्रांतीय आणि भाषीय भेदाभेद या काळातही अदृश रूपाने सुरू असून हा ढोंगीपणा असल्याची टीका त्यांनी केली.
चौकट
‘मन की बात’ करणाऱ्यांनी ‘जन की बात’ ऐकावी
“अनेकांना रोजगार नाही. त्यांचे जीवनमान ढासळते आहे. आपल्याकडील लोकांची समज कमी पडते आहे. भारतात भांबावलेपण आहे. या काळात निर्धाराने पुढे जायला पाहिजे. पण, तो निर्धार राजकारणात दिसत नाही. शासन आर्थिक धोरणाचा फेरविचार करायला तयार नाही. आत्मप्रौढीत सर्व मग्न आहेत. एकमेकांच्या उरावर बसण्याची स्पर्धा सुरू आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जे झाले त्याबद्दल देशाची क्षमा मागायला हवी,” असे डॉ. बाबा आढाव म्हणाले.
चौकट
मानपानाची अपेक्षा नाही, पण दोन शब्द ऐकाल की नाही?
“आमच्यासारख्यांनी स्वातंत्र्ययुद्ध पाहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्तिसंग्राम जवळून पहिला. दोन महायुद्धे आणि मोठमोठी जनआंदोलने पाहिली. आजची स्थिती पाहिल्यावर देशाच्या भवितव्याची काळजी वाटायला लागते. भारतासारख्या मोठ्या देशाला ‘ऑक्सिजन’साठी जगाकडे धावा करायला लागतो हे लाजिरवाणे आहे. मनुष्यत्वाला लाज वाटेल अशी स्थिती देशात आहे. आम्हाला मोठेपणा, मानपान नको आहे. पण अनुभवाचे बोल ऐकायचीही तयारी नाही. आमच्यासारख्यांची खिल्ली उडवली जाते याचे वाईट वाटते,” अशी खंत डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
चौकट
वाटले गेलेले ‘राष्ट्रपुरुष’ आणि शिक्षक
“प्रत्येक समाजसमूहाने आपापले राष्ट्रपुरुष वाटून घेतले आहेत. संविधानाला जर आपण आपले मानले आहे, तर मग संविधानाशी इमान जाहीर करा. देशात मनामनात संविधान एके संविधान रुजवून वाटचाल करावी लागणार आहे,” असे बाबांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी स्वस्थ बसू नये. पिढी घडविण्याची त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. शिक्षकांनी जबाबदारी घेऊन मुलांना स्वच्छता राखण्याबाबत प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.
चौकट
‘लोकमत’कडून अपेक्षा
“सध्याचा काळ बिकट आहे. माध्यमांची जबाबदारी वाढली आहे. रोजचे प्रश्न आणि समाजातील भयाण वास्तव समोर आणायला हवे. तरच व्यवस्था सुधारेल. लोकांचा अजूनही माध्यमांवर विश्वास आहे. तो जपला पाहिजे. ही जबाबदारी ‘लोकमत’ने उचलावी,” अशी अपेक्षा बाबांनी व्यक्त केली.