पुणे: मराठा आरक्षणाबाबत कोर्टाच्या निर्णयावर समाजात सर्वत्र नाराजी आणि अस्वस्थता आहे. समस्येवर मार्ग निघण्यासाठी मी सकारात्मक आहे. आरक्षणाबाबत मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यात माध्यमांसमोर अशी भूमिका मांडली आहे. कालच संभाजीराजे यांनी ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते.
सध्यस्तिथीत कोरोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो. आता मोर्चा काढण्यात काही अर्थ नाही. असेही त्यांनी सांगितले आहे.
मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मार्ग काढण्यात येईल. माझी भूमिका ही सकारात्मक असेल. असेही ते म्हणाले आहेत.
सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे मी तसे ट्विट केले. असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. माझी भूमिका ही शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका असेल. त्याच्या राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नसेल. ती समस्त मराठा समाजाची भूमिका असेल, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
अनेक राजकीय पक्ष सध्या वेगवेगळ्या प्रकारे मत व्यक्त करत आहेत. मात्र, ती माझी भूमिका नाही. मी मराठा आरक्षणासंदर्भात बराच अभ्यास केला आहे. १०२ वी घटनादुरुस्ती, ऍटर्नी जनरल न्यायालयात काय बोलले किंवा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी का, यावर मी लवकरच बोलेन. मी आता मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि अभ्यासकांना भेटणार आहे. न्यायमूर्ती गायकवाड यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.