पैशाची मागणी करताय, हे असले खपवून घेणार नाही; अजितदादांनी शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:58 IST2025-03-28T19:57:32+5:302025-03-28T19:58:21+5:30

साध्या कामासाठी जरी कुणी अधिकाऱ्याने पैसे मागितले तरी त्याचा बंदोबस्तच केला जाईल

I will not tolerate this if you are demanding money Ajit pawar gave a stern warning to government employees in baramati | पैशाची मागणी करताय, हे असले खपवून घेणार नाही; अजितदादांनी शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले

पैशाची मागणी करताय, हे असले खपवून घेणार नाही; अजितदादांनी शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले

बारामती: बारामतीत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना एवढ्या सुविधा देतो. सगळ्यांना जे काही पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतो. इथे येताना नव्या पैशाचा खर्च येत नाही. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला जात आहे. आता आठवा वेतन आयोग आल्यावर ताे द्यावा लागणार आहे. तरीही कामे करताना पैशाची कशासाठी मागणी करता. हे असलं काही आजिबात खपवून घेणार नाही. कोणीही कोणाच्याही वशिल्याने आलेला असला तरी मलां काहीही घेणंदेण नाही. काही जण फार सोकावलेले आहेत. त्यामुळे लक्ष घालून अशा लोकांना सरळ केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा शब्दात उपमुख्मंत्री अजित पवार यांनी कामे करण्यासाठी पैशांची मागणी करणार्या शासकीय कर्मचारी अधिकारी यांना सुनावले.

बारामती येथे शुक्रवारी(दि २८) एका आयोजित कार्यक्रमात पवार यांनी घडलेला किस्सा कथन करताना सबंधितांना निर्वाणीचा इशारा दिला. उपमुख्यमंत्री पवार   म्हणाले, आज माळेगांव येथे एका ठीकाणी गेलो होताे. यावेळी माझ्या जवळचा कार्यकर्ता भेटला. यावेळी त्या कार्यकर्त्याने सातबारावर जमिनीची नोंद करण्याच्या साध्या कामासाठी तलाठी का कोण त्याने १५ हजारांची मागणी केल्याची तक्रार माझ्याकडे केली. त्या संबंधित तलाठी यांना बोलवलं आहे. त्याचा बंदोबस्तच करणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी एवढा कडक वागून देखील निवडणुकीदरम्यान मलिदा गॅंगचा झालेल्या उल्लेखाची आठवण काढली. एक तर मलिदा गॅंगमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मी बारामतीच्या विविध विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी आणतो. हे सर्व आपण सर्वसामान्यांसाठी करतो. मात्र,काही पुढारी मला काम द्या, मला कुठलेतरी टेंडर देण्याची मागणी करतात. त्यामुळे ज्याला पुढारपणा करायचा आहे, त्याने  ठेकेदारी करू नये आणि ज्याला ठेकेदारी करायची आहे त्याने पुढारीपणा करु नये, असे पवार यांनी सुनावले.

तुम्हाला त्याची किंमत नाही का?

काहीजण माझ्या ‘पीए’ना निवेदन देण्याएेवजी माझ्याकडेच कामाचे निवेदन देण्याचा हट्ट धरतात. वास्तविक ते निवेदन माझ्याकडेच येते. तरी देखील ‘पीएं’ना निवेदनाचा कागद दिला जात नाही. माझ्या हातात कागद दिल्यावर मला समजते. आणि पीएंच्या हातात कागद दिल्यावर त्यावरील अक्षरे पुसली जातात का? असा सवाल पवार यांनी केला. मी एखाद्या खासगी कार्यक्रमात असलो तरी हा क्रम चुकत नाही. तुम्ही बटण दाबतात म्हणजे काय. एक लक्षात घ्या मी दुसऱ्यांना ६ वर्षासाठी न हात जोडता आमदार करू शकतो. कोट्यावधींची कामे मंजुर करतो. तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होतोय. त्यामुळे तुम्हाला त्याची किंमत नसल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला.

बारामतीकरांनी चुकीच्या दिशेने वाहने नेवू नयेत

निरा डावा कालव्याचे पाणी पुर्ण क्षमतेने वाहण्यासाठी तीन हत्ती चौकातील पुल उंच करावा लागला. त्यावेळी माझ्यावर मोठी टीका झाली. काहींनी पाहणीसाठी या कामाची माहिती नसणारी माणसे बाहेरून आणली. मी पहाटे पाचला उठुन सहाला पाहणी करतो. त्यावेळी अनेकजण साखरझोपेत असतात. आपण काम करताना कुठे चुका झाल्या तर त्या दुरुस्तही करतो. मार्ग काढतो. ड्रोनद्वारे पााहणी करुन पुलावरील वाहतुकीचे नियोजन करण्याची दक्षता घेतली असा टोला अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला. बारामतीकरांनी चुकीच्या दिशेने वाहने नेवू नयेत, असा सल्ला देखील यावेळी अजित पवार यांनी दिला.

सीटबेल्ट ,हेल्मेट वापरुन कारवाई टाळा 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीटबेल्ट बाबत दंडात्मक कारवाइचा कायदा कडक केल्याचे पत्र एकाने मला पाठविले. वास्तविक ‘गडकरीसाहेबां’नी तो कायदा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणला आहे. सीटबेल्ट ,हेल्मेट वापरुन कारवाई टाळण्याची भुमिका प्रत्येकाने धेतली पाहिजे अशी सुचना अजित पवार यांनी केली.

कोणालाही पळवाट काढता येणार नाही

वैद्यकीय क्षेत्रासाठी नुकताच एक कायदा ‘पास’ केला आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांसाठी राखीव जागा ठेवणे आवश्यक आहे. पण काहीजण गडबड करीत होते. पण आता कोणालाही यातून पळवाट काढता येणार नाही. कारण मंत्रालय स्तरावर एका ‘क्लीक’वर शिल्लक बेडची माहिती ‘सीएम’ आणि ‘डीसीएम’ ना आता समजणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Web Title: I will not tolerate this if you are demanding money Ajit pawar gave a stern warning to government employees in baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.