पुणे : काेथरुड विधानसभा मतदार संघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर हाेताच अनेक चर्चांना उधाण आले हाेते. आमचा आमदार घरचा हवा असे बॅनर देखील काेथरुड भागात लावण्यात आले हाेते. भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात हाेते. त्या सगळ्याला खाेटं ठरवंत ''पाठीत खंजीर खुपसला तरी भारतीय जनता पार्टीचा विजय असाे'' अशीच घाेषणा देईल असे म्हणत आपण भाजपामध्येच राहणार असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तसेच पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या काेथरुड विधानसभा मतदारसंघातून यंदा आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पाटील यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विराेध हाेण्यास सुरुवात झाली. दूरचा नकाे घरचा पाहिजे आमचा आमदार काेथरुडचा पाहिजे असे लिहीलेले बॅनर काेथरुड भागात विविध ठिकाणी लावण्यात आले हाेते. मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्या देखील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या हाेत्या. आज काेथरुडमध्ये भाजपाच्या मेळाव्यात कुलकर्णी यांनी पाटील यांना निवडूण आणणार असल्याचे सांगत पक्षाशी बंडखाेरी करणार नसल्याचे स्पष्ट केले.
कुलकर्णी म्हणाल्या, आमदार असताना विविध याेजना काेथरुडमध्ये मी आणल्या. काेथरुडकरांनी मला माेठ्या मताधिक्याने 2014 ला निवडूण दिले. दादांनी देखील या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यात या भागातील पुरग्रस्तांचा प्रश्न दादांनी मार्गी लावला. आजही शिवणे भागातील काही नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले हाेते. त्यांना मी आश्वासन दिले की दादा या भागातील आमदार हाेणार असल्याने तुमचे प्रश्न ते नक्कीच साेडवतील. उमेदवारीमध्ये कुठेही जातीचा विषय नाही. आम्ही कधीही जात पाहून राजकारण केले नाही. नागरिक जे कुठले प्रश्न घेऊन आले ते मी साेडविण्याचा प्रयत्न केला. काेथरुडमध्ये पक्षाची रुजवात नव्हती तेव्हापासून मी या भागातील नगरसेविका आहे. या भागातील प्रत्येक नागरिकाशी संबंध जाेडून पक्ष वाढविण्याचे काम केले. घराघरांमध्ये जाऊन भाजपाचा प्रचार केला.
काल मला अनेक संघटनांचे फाेन आले. काेणालाही जातीच्या आधारावर नाही तर कर्तृत्व पाहून काम मिळायला हवे. मी कुटुंबाकडे दुर्लक्ष करुन पक्षाचे काम केले. माझी माझ्या संघटनेवर पूर्ण निष्ठा आहे. काेणी पाठीत खंजीर खुपसले तरी मी भारतीय जनता पार्टीचा विजय असाे असेच म्हणेन. काेणी काय म्हणाले त्याच्याशी मी सहमत नाही. उमेदवारी न मिळाल्याचे दुःख झाले. ती भावना मी व्यक्त केली. परंतु दादांची भेट घेऊन मी त्यांना म्हणाले दादा तुम्ही जाे आदेश द्याल ते मी करायला तयार आहे असेही कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.
तसेच चंद्रकांत पाटील यांना माेठ्या मताधिक्याने निवडूण आणण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यकर्त्यांमधील संभ्रम टाळण्यासाठी बाेलत असून सर्व कार्यकर्ते साेबत असल्याचेही कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले. दादा तुम्ही घरी या तुमचे औक्षण करायचे आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या.