पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आले आहेत. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या हू इस धंगेकर या वक्तव्याने तर धंगेकरांबाबत राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला आहे. कसब्याची निवडणुकही देशभरात चर्चिली गेली आहे. अशातच धंगेकरांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्यानंतर रवींद्र यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी करमाळा येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हे वक्तव्य केलं आहे
धंगेकर म्हणाले, मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते आणि आमचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न व्यक्त केलं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण मला माझी ताकद माहित आहे. आणि इच्छा व्यक्त करण्यात काहीही गैर नसल्याचे धंगेकरांनी यावेळी सांगितले आहे.
अजित पवारांनी व्यक्त केली होती इच्छा
एका माध्यम समूहाच्या कार्यक्रमात अजित पवारांना तुम्हाला येत्या निवडणुकीत मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी अजितदादांनी १०० टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे सांगितले होते. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात विविध चर्चाना सुरुवात झाली होती.
रवींद्र धंगेकर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. मनसेत असताना त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघात अनेक सामाजिक कामे केली आहेत. जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा २००९ मध्ये धंगेकर यांनी निवडणूक लढवली होती. अवघ्या ७ ते ८ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी गिरीश बापट विजयी झाले होते. त्यांनी बापटांना चांगली लढत दिली होती. त्यानंतर आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. कसबा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत धंगेकरांनी विजय मिळवला आणि आमदार झाले.