पुणे: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Ias Pooja Khedkar) यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांवरून आता त्यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी होणार आहे. दिलीप खेडकर यांचे उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? असा सवाल उपस्थित झाल्यानंतर ही चौकशी होणार असल्याचे समजते.
पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एनटी ३ या संवर्गातून प्रवेश मिळवला होता. त्यावेळी त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रही जोडल्याचे स्पष्ट झाले होते. वास्तविक, दिलीप खेडकर हे त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते. त्यामुळे २००७ मध्ये त्यांचे उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी कसे असेल, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यानंतर पूजा खेडकर यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ओबीसी संवर्गातून तसेच दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएसची श्रेणी मिळवली होती. त्यासाठी त्यांनी पुन्हा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडले होते. त्यानंतर एका वर्षातच अर्थात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ४० कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पूजा यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. याच अनुषंगाने आता प्राप्तिकर विभागाने दिलीप खेडकर यांनी सादर केलेल्या प्राप्तिकर परताव्यावरून त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे समजते.