‘उच्च व तंत्रशिक्षण’चे ‘आयएएस’ दर्जाचे सचिव मला बोलायला घाबरतात’ - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:20 AM2023-08-29T11:20:58+5:302023-08-29T11:21:59+5:30
केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास टाकून, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीसाठी मला शिक्षणमंत्री केले
पुणे : विद्यार्थी परिषदेत काम करीत हाेताे तेव्हापासून मी शिक्षण क्षेत्रात काम करीत आहे. त्यामुळे मला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आयएएस दर्जाचे सचिवही माझ्याशी बोलायला घाबरतात. काेणी नवीन शिक्षणमंत्री झाला असता, तर त्याला यूजीसी, एआयसीटीई, बी-आर्च, एम-आर्च, सीईटी म्हणजे काय ? असे सर्वच त्याच्यासाठी नवीन असते. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास टाकून, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीसाठी मला शिक्षणमंत्री केले, असा खुलासा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.
सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, संचालक पूजा मिसाळ, दीपक मिसाळ, आर्किटेक्चर काॅलेजच्या प्राचार्य डॉ. पूर्वा केसकर आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पोरितोषिकांचे आणि शिष्यवृत्तींचे वाटप करण्यात आले.
पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी २०२० मध्ये केल्यानंतर, तत्कालीन राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याला विरोध दर्शविला. त्यामुळे तीन वर्षे हे धोरण राज्यात राबविता आले नाही. त्यानंतर माझ्याकडे याची जबाबदारी आल्यानंतर, पंधराशे कॉलेजांमध्ये हे धोरण राबविण्यात यशस्वी झालो. पुढच्या वर्षी पाच हजार कॉलेज आणि ४२ विद्यापीठांमध्ये हे धोरण राबविण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील ३३ लाख विद्यार्थ्यांना होणार असून, मुलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.