साने गुरुजी आरोग्य मंदिर या शिक्षण संस्थेच्या वतीने पार्वतीबाई आव्हाड स्मृती उत्कृष्ठ बालवाङ्मय पुरस्कार बर्वे लिखित ‘पियूची वही’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. बालसाहित्याच्या विविध विषयांवर त्या प्रकाशझोत टाकतात. त्याबद्दल त्या म्हणतात, की बालवाङ्मयाला रसिकांची पसंती मिळत आहे. सध्या बालवाङ्मयाला चांगले दिवस आहेत. नवनवीन बालसाहित्यिक हे मुलांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक बालसाहित्यप्रेमी मुलांकरिता विविध उपक्रम राबवत आहेत. ही एकूणच सगळी आनंदाची प्रक्रिया म्हणावी लागेल. लहान मुलांचे मनोविश्व अत्यंत तरल आणि संवेदनक्षम असते. तेव्हा त्या मनाला साजेल, भावेल असे लेखन करणे हे अवघड असते. बालसाहित्यिक ते आव्हान पेलतो. त्याचे लेखन सर्वश्रुत होते. यामागील त्याची अथक विचारक्षमता लक्षात घ्यायला हवी. आपण खुपदा लहान मुले वाचत नाहीत अशी ओरड करतो. त्यात काही तथ्य नाही. याचे कारण असे, की तुम्ही लहान मुलांना काय वाचायला देता हे जास्त महत्त्वाचे आहे. दुसरं म्हणजे त्यांच्या बालमनाला जे आवडतं, भावतं ते साहित्य ते वाचतातच. त्यामुळे बालसाहित्यिकाने लहानांसाठी लिहिताना साधं, सरळ, सोपं लिहायला हवं. आपल्याकडील काही साहित्यिकांनी बालसाहित्यामध्ये नको तितका बोजडपणा आणल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम बालसाहित्यावर झाला. आपण लहान मुलांसाठी लिहितो याचा विसर पडू न देणे हे जमायला हवं. दुसरं असे, की मुलं वाचत नाहीत असा सूर आळवला जातो. यावर उत्तर म्हणजे त्यांना जे आवडते ते आपण देतो का? वाचक हा कुठल्याही स्तरातील असो, त्याच्या आवडी लक्षात घेऊन साहित्याची उपलब्धता असल्यास वाचन होतेच. केवळ नकारात्मकता तयार करण्यासाठी याप्रकारच्या आरोपांत काही तथ्य नाही असे म्हणावे लागेल. वाचनावर परिणाम करणारे घटक वाढले. माध्यमे वाढली. टीव्हीवरील वाहिन्या, सोशल माध्यमे, इंटरनेट यामुळे वाचनाकरिता हाताशी वेळ कमी राहिला. दिवसभरातील बराचसा वेळ हा वेगवेगळ्या माध्यमांवर खर्च झाला. भविष्यात मुलांना वाचनाची गोडी लावायची असल्यास त्यांची आवड जोपासावी लागणार आहे. लहान मुलांचे भावविश्व आणि साहित्यिक याविषयी सविस्तराने सांगायचे झाल्यास, साहित्यिकाला आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून काय सांगायचे आहे हे ठरवून त्या साहित्याचा परिघ मनात तयार ठेवावा लागतो. आपले साहित्य कोण वाचणार आहे? हा मुद्दा त्यानंतरचा. वाचकांच्या मानसिकतेचा विचार महत्त्वाचा आहे. खास करून लहान मुलांकरिता जेव्हा लेखन होते त्याप्रसंगी लेखकाला विशेष काळजी घ्यावी लागते. भाषा, संवाद, रुपके, प्रतीके, कथेची मांडणी, कवितेतील शब्द यात बारकाईने केलेल्या विचारांमुळेच त्या साहित्याची उंची वाढते. मग ते लोकप्रिय होते. आपल्याकडे बालसाहित्य क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज असून, त्यांची आवड जोपासण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागणार आहे. केवळ लहान मुलांकरिता पुस्तके काढून उपयोग नाही, तर ते साहित्य त्यांच्याकरिता वाचनयोग्य होण्यासाठी बालसाहित्यिकाची जबाबदारी वाढली आहे. मुलांना ओळखून लिहायला शिकणे, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, पोटात शिरून लिहायला जमल्यास तो लेखक आणि बालवाचक यांचा संवाद बहरतो. खरं तर कुठल्याही प्रकारच्या साहित्याच्या उन्नतीकरिता जाणीवपूर्वक कार्यशील आणि प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे वाटते.
चिमुकल्यांच्या भावविश्वाचा विचार महत्त्वाचा - डॉ. संगीता बर्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 2:09 AM