नेरे (जि. पुणे) : महापुरुषांचे विचार नवीन पिढीला दिशा देणारे असून या मौल्यवान विचारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. या विचारांचा यज्ञ भोर मधून सुरु झाला असून यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.येथील तिसरे फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाच्या दुसºयाा सत्राचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी जेष्ठ सिने दिग्दर्शक जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख डॉ. विजय खरे, माजी मंत्री अनंतराव थोपटे, जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रोहिदास जाधव उपस्थित होते.शिंदे म्हणाले, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांनी समाजाला जगण्याची दिशा दिली. हे विचार सर्वांनी आत्मसात करावे. आजच्या काळात हे विचार जपण्याची नितांत आवश्यकता आहे. जब्बार पटेल म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आपण सर्व बांधले गेलो आहोत. मानवताधर्म शिकवणारी भारतीय राज्य घटना ही एक चुंबकिय शक्ती आहे. भावनेपेक्षा वैचारिक भूमिकेतून भारतीय राज्यघटनेकडे पाहिले गेले पाहिजे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्य गौरव पुरस्काराने साहित्यिक चंद्रकांत सकपाळ यांना गौरवण्यात आले. स्काऊट गाईडचा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कु. अंजली सोमनाथ कुंभार हिचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘सूर्य फुले’ या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
महापुरुषांचे विचार नव्या पिढीला दिशा देणारे - सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 3:54 AM