लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस वसाहतीत कर्मचार्यांच्या निवासासाठी नव्या उभारण्यात आलेल्या या दोन इमारती पोलीस दलासाठी एक आदर्शवत उदाहरण आहे. राज्यभरात पोलिसांसाठी घरे बांधताना या इमारती डोळ्यासमोर ठेवून कामे केली जातील, असे राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले
पर्सिस्टंट फाउंडेशन आणि देशपांडे कुटुंबीयांच्या मदतीने कर्मचार्यांसाठी उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. ११) त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी नागरी संरक्षण दलाचे महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, फाउंडेशनचे डॉ. आनंद देशपांडे, सोनल देशपांडे, दादा देशपांडे उपस्थित होते. पोलिसांसाठी शिवाजीनगर मुख्यालयात उभारण्यात आलेल्या मल्टिअॅक्टिव्हिटी सेंटरची पाहणी पांडे, डॉ. के. व्यंकटेशम यांनी केली.
पांडे म्हणाले, “अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इमारत बांधण्यात आली आहे. राज्याच्या पोलिस दलात कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत अशी वास्तू झाली नव्हती. त्यामुळे पुढील काळात राज्यभरात कर्मचाऱ्यांसाठी वास्तू उभी करताना अशा प्रकारे इमारत उभारण्यावर भर दिला जाईल.”
पोलिस गृहनिर्माण विभागाच्या महासंचालकांना आवर्जून शिवाजीनगर पोलिस कर्मचारी वसाहत पाहण्यास सांगू, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, देशपांडे कुटुंबीयांनी 'सीएसआर' म्हणून नाही, तर स्वकमाईतून इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा प्रकारे राज्य सरकारने मान्यता दिलेला हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात दोन कुटुंबांना घराची चावी देण्यात आली.
.......
या २ इमारती प्रत्येकी २२ मजली असून प्रत्येकी इमारतीमध्ये ८४ फ्लॅट आहेत. या इमारतीमध्ये एमएनजीएल गॅस पाईपलाईन, तसेच अग्निशामक विरोधक पाईपलाईन करण्यात आली आहे.