पुणे : संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींची ओळख परेड ही कायद्याच्या चौकटीत झाली नसून, पुरावा कायद्याचा भंग झाला असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी येथील विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. बचाव पक्षाचे अॅड. बी. ए. अलुर युक्तिवादादरम्यान म्हणाले, ‘ओळख परेडदरम्यान आरोपींना यापूर्वी पाहिले आहे का?, पोलीस ठाण्यात अथवा अन्य ठिकाणी साक्षीदारांना आरोपी दाखविण्यात आले आहेत का, असे प्रश्न कार्यकारी अधिकाऱ्यांनी साक्षीदाराला विचारणे बंधनकारक आहे. परंतु तसे प्रश्न विचारल्याचे अहवालामध्ये नमूद नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यासोबतच कारागृहामध्ये ओळख परेड घेऊ नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही कारागृहातच ओळख परेड घेण्यात आल्याचे अलूर म्हणाले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर काम पाहत आहेत. बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. आलुर, अॅड. रणजित ढोमसे-पाटील आणि अॅड. अंकुश जाधव काम पाहत आहेत. सरकारी पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून, बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू आहे.
आरोपींची ओळख परेड कायद्याच्या चौकटीत नाही
By admin | Published: March 25, 2017 4:11 AM