पुणे: गेल्या वर्षभरापासून महापालिकेने आॅनलाईन सेवाची प्रभावी अंमलबजावणी केली असून पुणेकरांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पुणेकरांना अधिकाधिक सुविधा आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देणे व प्रशासकीय कामात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी एंटरप्राईज जीआयएस, ई-लर्निंग प्रकल्प, सिटी डिजीटल स्ट्रॅटेजी, पीएमसी केअर २.० या सुविधा पुणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे येत्या काही वर्षांत पुण्याची डिजिटल शहर म्हणून जगाच्या नकाशावर ओळख निर्माण होईल , असे मत महापौर मुक्त टिळक यांनी येथे व्यक्त केले.महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते शुक्रवारी बालगंधर्व येथे एंटरप्राईज जीआयएस, ई-लर्निंग प्रकल्प,सिटी डिजीटल स्ट्रॅटेजी,पीएमसी केअर २.० या योजनांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी बोलताना टिळक म्हणाल्या,नागरिकांना सेवा-सुविधा देत असतानाच प्रशासनात नागरिकांचा सहभाग वाढणार आहे. मिळकत कर, जन्म-मृत्यू दाखले, मनपाच्या विकासकामांची माहिती आदी सुविधा आॅनलाईन माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचणार आहेत. या प्रकल्पांमुळे रस्ते दुरुस्ती, नळ कनेक्शन जोडणी,सेवा वाहिन्या याबाबत वेळेत माहिती प्राप्त झाल्याने प्रशासन व नागरिकांना लाभ होणार आहे. नागरी सहभागामुळे ख-या अर्थाने पुणे शहर डिजिटल शहर होवून जगाच्या नकाशावर ठसा उमटवेल. डिजिटल क्षेत्रात अशा प्रकारचे कार्य करणारी पुणे महानगरपालिका एकमेव ठरलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजविषयक अलिकडेच देशभर झालेल्या सर्वेक्षणाअंतर्गत पाहणी केल्यानंतर पुणे महानगरपालिका देशात अव्वल ठरलेली आहे.याच सर्वेक्षणात पालिका कामकाजाशी नागरिक कसे जोडलेले आहेत त्याबाबत नमूद केलेले आहे. नागरी सेवा सुविधांबाबत प्राप्त झालेल्या ९३,००० तक्रारींपैकी सुमारे ९२,५०० म्हणजेच जवळपास ९८% तक्रारींचे निवारण करण्यात आले. बहुतांश घरात स्मार्ट फोनसारख्या सुविधा आहेत. त्यामुळे आॅनलाईन, डिजिटल सुविधांद्वारे नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. शुक्रवारी सुरू होत असलेल्या डिजिटल सेवांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. जीआयएस प्रकल्पाचा वापर, पाणी कनेक्शन जोडणी, डीबीटी, ई-लर्निंग, सिटी डिजिटल स्ट्रॅटेजी, पीएमसी केअर याबाबतही त्यांनी याप्रसंगी सविस्तर माहिती दिली. यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, दिलीप वेडेपाटील, गायत्री खडके उपस्थित होते.
पुण्याची डिजीटल शहर म्हणून जगाच्या नकाशावर ओळख निर्माण होईल : मुक्ता टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:53 IST
नागरी सहभागामुळे ख-या अर्थाने पुणे शहर डिजिटल शहर होवून जगाच्या नकाशावर ठसा उमटवेल. डिजिटल क्षेत्रात अशा प्रकारचे कार्य करणारी पुणे महानगरपालिका एकमेव ठरलेली आहे.
पुण्याची डिजीटल शहर म्हणून जगाच्या नकाशावर ओळख निर्माण होईल : मुक्ता टिळक
ठळक मुद्दे महापालिकेच्या सिटी डिजीटल स्ट्रॅटेजीचा शुभारंभस्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजविषयक सर्वेक्षणात पुणे महानगरपालिका देशात अव्वल