पुणे : वेगवेगळ्या घराण्यांतील दिग्गज कलाकारांकडून घराणे, परंपरा, परंपरेमध्ये पखवाजवर वाजवल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण बोलांच्या रचना, विविध जाती, गती, यतींमधील रचना, रचनानिर्मिती मागील विचार यावर वैचारिक चिंतन घडले.
निमित्त होते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने ‘भारतातील पखवाज परंपरा’ या विषयावर दोन दिवसीय ऑनलाईन कार्यक्रमाचे. पंडित ज्ञानोबा लटपटे, दालचंद शर्मा, राजकुमार झा, निखिल घोरपडकर, पृथ्वीराज कुमार, चंचल कुमार भट्टाचार्य, निशांत सिंह, भाई बलदीप सिंह यांनी पखवाजाच्या विविध मुदद्यांवर चर्चा केली आणि पखवाजाचा एक प्रवास उलगडला. तसेच, त्यांनी परंपरेतील विद्वानांचे विचार, प्रचलित नसलेले ताल, साथसंगीतातील विचार, पखवाजाची बनावट आदी मुद्द्यांवर विचार मांडले. भारतातील पखवाजाच्या परंपरा समर्थपणे पुढे चालविणा़ऱ्या या कलाकारांशी केंद्रातील संगीत विभागप्रमुख डॉ. चैतन्य कुंटे यांनी संवाद साधला. केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे हे कार्यक्रमाला उपस्थित होते.