पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी तयार केलेल्या फिरत्या हौद रथांमध्ये शहरात दीड दिवसांच्या ६७४ गणपतींचे रविवारी विसर्जन करण्यात आले. तर विविध ठिकाणी उभारलेल्या १८७ मुर्तीदान केंद्रांवर १७१ श्रींच्या मुर्ती पालिका यंत्रणेकडून स्विकारण्यात आल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करावे आणि सार्वजनिक मंडळातील गणपतीचे मांडवातच विसर्जन करावे, असे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.त्याला पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अनेकांनी घरच्या घरी बादलीत गणेश मुर्तीचे विसर्जन केले. तसेच ज्यांना घरच्या गणपतीचे घरी विसर्जन करणे शक्य नाही, अशा सुमारे ६७४ नागरिकांनी पालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध करून दिलेल्या फिरत्या हौदात विसर्जन केले.
महापालिकने एका क्षेत्रिय कार्यालयात दोन या प्रमाणे ३० पर्यावरण पूरक गणेश विसर्जन फिरत्या हौद उपक्रमाचा रविवारी सकाळी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक व आदी अधिकारी उपस्थित होते.
शुभारंभानंतर सकाळी अकराच्या सुमारास हे फिरते हौद प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत पाठविण्यात आले. या ठिकाणी फिरत्या हौदाचा मार्ग, वेळेचे नियोजन करण्यात आले असून, त्याची माहिती मुख्य चौकांमध्ये देण्यात आली आहे. तसेच या हौदांवर ध्वनी क्षेपकावरूनही वेळोवेळी हौद कुठे जाणार व येणार याची माहिती दिली जाणार आहे.
------------------------