'मंत्री असावा तर नितीनजींसारखा'; मोदी-शहांनंतर अजित पवारांकडून गडकरींचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 04:16 PM2023-08-12T16:16:26+5:302023-08-12T16:17:37+5:30

अजित पवार यांनी भाजपासोबत सत्तेत सहभाग घेतल्यापासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे.

If a minister should be like Nitinji; Gadkari praised by Ajit Pawar after Modi-Shah | 'मंत्री असावा तर नितीनजींसारखा'; मोदी-शहांनंतर अजित पवारांकडून गडकरींचं कौतुक

'मंत्री असावा तर नितीनजींसारखा'; मोदी-शहांनंतर अजित पवारांकडून गडकरींचं कौतुक

googlenewsNext

पुणे -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील रस्त्याचे लोकार्पण पार पडले. पुण्यातील ८६५ कोटी रुपये किंमतीच्या एनडीए चौक (चांदणी चौक) प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे लोकार्पण आज झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपस्थित होते. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी, भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं.

अजित पवार यांनी भाजपासोबत सत्तेत सहभाग घेतल्यापासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांचे कौतुक केले होते. मोदींसारखा नेता सध्यातरी देशात दुसरा कोणी नाही, असे म्हणत मोदींच्या नेतृत्त्वावर स्तुतीसुमने उधळली होती. तर सहकार विभागातील निर्णयामुळे अमित शहांचेही कौतुक केले होते. आता, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींचंही त्यांनी कौतुक केलंय.  

एखादा मंत्री कसा असावा याचं उदाहरण म्हणजे नितीन गडकरी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशात ज्याप्रकारे बोगदे झाले, फ्लायओव्हर झाले, राष्ट्रीय महामार्ग झाले, अनेक शहरांमध्ये रिंग रोड झाले. या सर्वांची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून नितीन गडकरी यांनी उचलली आहे. त्यापूर्वी युती सरकारच्या काळातही त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे केला आहे. जे चांगलं काम करतात, त्याचा विसर जनता कधीही पडू देत नाही, असे म्हणत अजित पवार यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. 

चांदणी चौकातील कामाच्या उद्घाटनाचा मला व आपणा सर्वांना आनंद होतोय. कारण, हे होण्यासाठी खूप अडचणी आल्या, अनेकांनी पाठपुरावा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. मात्र, गडकरींनी दिलदारपणे हाही प्रश्न सोडवला, असेही अजित पवार यांनी सांगितले.

पुलाची उभारणी, दीड लाख वाहनांची कपॅसिटी

पुढील ५० वर्षांचा विचार करुन चांदणी चौक पुलाची उभारणी करण्यात आली आहे. दिवसाला दीड लाख वाहने या ठिकाणावरुन सुसाट धावू शकतील. १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे नुतनीकरणाचे काम फेब्रुवारी २०१९ ते १२ ऑगस्ट २०२३ कालावधीत पूर्ण झाले.

Web Title: If a minister should be like Nitinji; Gadkari praised by Ajit Pawar after Modi-Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.