राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय पुन्हा घेत नव्याने कोरोना चेन ब्रेक करायला सुरुवात केली आहे. एकीकडे शेतीसंबंधित सेवा सुरू राहतील असे आदेशात म्हटले असले तरी शेतीशी संबंधित अवजारे बनविण्याची वर्कशॉप, शेती विमा व कोरोना लसीकरण करणारी सीएससी केंद्रे व इतर ठिकाणे स्थानिक प्रशासनाने बंद ठेवण्याचा फार्स घातल्याने बळीराजा पुन्हा मेटाकुटीला येण्याची चिन्हे असून लहान व्यावसायिकांवर पुन्हा संक्रांत ओढवली आहे.
शासनाने ३० एप्रिल रोजी पहिल्या सूचना निर्गमित केल्या. त्यानंतर त्यात अधिक अटी घालून नव्याने आज ब्रेक कोरोना चेनचा आदेश काढला. मात्र, या आदेशात अतिशय त्रोटक माहिती असल्याने नेमक्या कोणत्या आस्थापना बंद ठेवायच्या व कोणत्या सुरू ठेवायच्या याबाबत नागरिक व व्यवसायिक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. माॅन्सूनपूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांच्या खांद्यावर आली आहेत. या कामांना शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र ही कामे ज्या साधनांनी करायची त्याची दुरुस्ती करणारी वर्कशॉप मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. दुसरीकडे शासनाच्या ऑनलाईन धोरणाने शेतकऱ्यांचे पीक विमा ते इतर अनेक कामे आता ऑनलाईन आहेत. त्यातच कोरोना लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. आयकर विभागाची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढल्याने व्यावसायिक त्या कामात व्यस्त आहेत. मात्र आता अचानक बंद पाळण्याचे आदेश आल्याने नेमके यातून काय साध्य होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणे, किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला यांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. ब्रेक चेनचा आधार घेत पुन्हा खाद्यपदार्थ व किराणा वस्तूंची साठेमारी करून चढ्या किमतीत विकली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा व छोट्या व्यावसायिकांचा विचार करून शासनाने व स्थानिक प्रशासनाने पाऊले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
"गेल्या लॉकडाउनमध्ये अंदाजे तीन चार लाख रुपयांचे नुकसान झाले. आमच्या अंगमेहनतीवर आमचा व्यवसाय अवलंबून आहे. आता परत आमची वर्कशॉप बंद केली आहेत. शेतकऱ्यांच्या अवजारांची डागडुजी न झाल्यास हंगाम व्यवस्थित कसा पार पडणार ? प्रशासनाने याची दखल घेणे आवश्यक आहे."
- संजय थोरात, श्रीदत्त स्टील वर्क्स, नीरा, मार्केट यार्ड