पिंपरी : नेरे-दत्तवाडी (मुळशी) रस्त्यावरील फार्महाऊसमधील पार्टी उधळून पोलीसांनी ६२ जणांना ताब्यात घेतले. त्यातील ३५ तरुण आणि काही तरुणींनी मद्याचे सेवन केल्याचे आढळून आल्यावरही त्यांची वये लक्षात घेता लेखी हमीपत्रावर सोडून दिले. मात्र, यामध्ये दारुचा साठा सापडला असतानाही उत्पादन शुल्क विभागाने साधी दखलही घेतली नाही. नेरे- दत्तवाडीत उद्योजक जमतानी यांच्या फार्म हाऊसवर पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकला. यातील तरुणांना पकडून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्यांची तपासणीही केली. त्यामध्ये अनेक जणांनी दारुचे सेवन केल्याचे आढळून आले. मात्र, या घटनेनंतरही उत्पादन शुल्क विभागाचा कोणीही अधिकारी- कर्मचारी इकडे फिरकला नाही. पोलीसांकडे तक्रार देणे सोडाच परंतु माहितीही घेतली नाही. वास्तविक खासगी जागेमध्ये पार्टी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. मोठ्या प्रमाणावर दारू खरेदी करताना संबंधितांकडे परवाना आहे का? याची खातरजमाही संबंधित वाईन शॉपच्या चालकाने घेणे बंधनकारक आहे. यासाठी वाईन शॉपमध्येच पाच रुपयांचा परवाना मिळतो. त्यामध्ये मद्यसेवनाची परवानगी आणि मद्यसेवन केल्यावरही जबाबदारीने वागेल, असे लिहून दिलेले असते. परवानगीशिवाय होणाऱ्या या प्रकारच्या पार्ट्या रोखणेही उत्पादन शुल्क विभागाचेच काम आहे. जमतानी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारासाठी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. एका नामांकित महाविद्यालयात शिकणारे हे तरुण- तरुणी आहेत. सर्व परप्रांतीय असून, शिक्षणासाठी ते पुण्यात आलेले आहेत. रात्री दीड वाजता त्यांनी नेरेतील फार्महाऊसवर मद्य प्राशन करून धांगडधिंगाणा सुरू केला. डीजेचा आवाज नेरे दत्तवाडीतील रहिवाशांची शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरला. रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात स्पिकर सुरू असल्याची तक्रार गावकऱ्यांपैकी एकाने गस्तीवर असलेल्या पोलिसांकडे केली. गस्तीवरील पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे आणि सहायक पोलीस निरीक्षक कदम यांनी फार्महाऊसकडे धाव घेतली. पहाटे साडेतीन वाजता पोलीस फार्महाऊसवर पोहोचले. त्या ठिकाणी डीजेच्या संगीताच्या तालावर तरुण-तरुणी नाचत असल्याचे त्यांना पाहावयास मिळाले. पोलीस पोहोचताच त्यांचा धांगडधिंगाणा थांबला. पोलिसांनी तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. फार्महाऊसची पाहणी करून मद्याच्या, शितपेयाच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे असा सुमारे साडेसहा हजारांचा मद्यसाठा जप्त केला. एका मिनीबसमधून सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. सकाळी औंध सर्वोपचार रुग्णालयात तरुणींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तर, तरुणांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. मद्याचे सेवन आढळून आले मात्र कोणीही अमली पदार्थ सेवन केले नसल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)
‘रेव्ह’ नसली तरी मद्यपार्टी अवैधच
By admin | Published: July 19, 2015 3:53 AM