मंचर : ‘‘आंबेगावचे लोकप्रतिनिधी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. खासदारांमुळे विमानतळ खेडबाहेर गेले हा आरोप सिद्ध करा, मी राजकारण सोडेन. सिद्ध करता आले नाही आले तर तुम्ही राजीनामा द्या,’’ असे आव्हान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा समारोप मंचर येथे झाला. त्या वेळी झालेल्या सभेत आढळराव पाटील बोलत होते. ते म्हणाले, वळसे पाटील ६ वेळा आमदार झाले. त्यांनी २७ वर्षांत काय केले याचा हिशेब जनतेला दिला पाहिजे. मी ३ वेळा लोकसभेला निवडून आलो आहे. त्यामुळे जनतेने निवडून दिल्याने कामाचा हिशेब मी जनतेला सांगण्यास बांधिल आहे.माझ्या सोबत होते त्या वेळी सुधारणा झाली होती, आता कोण कोण बरोबर असते ते काय माहीत, असा टोला त्यांनी लगावला.बैलगाडा शर्यतीसंदर्भात मार्चच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. वळसे पाटील म्हणतात विधानसभेत खासगी विधेयक आणणार. मग २७ वर्षे काय करत होत? असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजाराम बाणखेले यांच्यावर टीका करताना आढळराव पाटील म्हणाले, माझी काय चूक झाली, माझ्यावर अन्याय झाला, असा अपप्रचार बाणखेले करतात. पक्षाच्या विरोधी लढायचे व मी निष्ठावंत म्हणायचे हे चालणार नाही. बऱ्याच लोकांचा विरोध असूनसुद्धा तुम्हाला पक्षात घेतले ही आमची चूक झाली. गद्दारांना परत शिवसेनेत प्रवेश नाही, असे आढळराव यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन : आढळराव
By admin | Published: February 20, 2017 1:57 AM