पुणे : राज्यभरात औरंगजेबाची कबर काढण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. कबर हटाव मोहीम दरम्यान या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्यांकडूनही कबर हटाव मोहिमेला पाठिंबा दिसून आला आहे. तर विरोधकांकडून टीका टिपणी केली जात आहे. अशातच आमदार नितेश राणेंनी औरंगजेबच्या कबरीबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कबर पाकिस्तानात पाठवून द्या असं राणे म्हणाले आहेत. शिवनेरी किल्यावर शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने ते आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राणे म्हणाले, सगळ्यांची भावना एकच आहे. ही पण जोरात साजरी व्हावी. अशी समस्त हिंदू समाजाची इच्छा आहे. ती सरकारपर्यंत आम्ही नक्की पोहोचवण्याचं प्रयत्न करू. औरंगजेबाच्या कबरीबाबत राणेंना विचारले असता ते म्हणाले, आज हिंदू समाजाची भावना हीच आहे. आज महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको आहे. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. ज्या औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून संपवलं. त्याची कबर आपल्याकडे कशाला पाहिजे. काही लोकांना ती मोठी आठवण वाटते. ती आम्हाला हिंदू समाज म्हणून नको आहे. कोणाला ती पाहिजे असेल तर पाकिस्तान, बांग्लादेशात घेऊन जावं. तीच भावना मी आज व्यक्त केली आहे. आमचे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू विचारांचे कार्यकर्ते पूर्ण समाज बोलतोय की, ती कबर महाराष्ट्रात नको. ती भावना आपल्याला कळायला हवी. म्हणून राज्यभर हे आंदोलन होत आहे. सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत.
मल्हार सर्टिफिकेटच्या नावाबाबत राणेंना विचारले असता ते म्हणाले, लोकांची भावना महत्वाची आहे. एक हलाल सर्टिफिकेट ८० हजाराला विकलं जातंय. ते पैसे लव्ह जिहाद साठी वापरले जात आहेत. त्यावर आपण लक्ष ठेवायला हवे. नावासंदर्भात त्या प्रमुख लोकांपर्यंत सर्व काही गोष्टी पोहोचवल्या आहेत. ते योग्य पद्धतीने निर्णय घेतील असे त्यांनी यावेळी सांगितले.