पुणे : दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या प्रभागातील रिक्त जागेसाठी भाजप-रिपाईतर्फे कांबळे यांची कन्या हिमाली हिने केवळ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या तिकिटावर निवडणूक लढविल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपचा उमेदवार असल्यास राष्ट्रवादी रिंगणात असेल,असे राष्ट्रवादी शहराध्यक्षा खासदार वंदन चव्हाण यांनी सांगितले़ तसेच अपक्ष व बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.मुंढवा-घोरपडी येथील नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पुण्यात रिपाईच्या पदाधिका-यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी पुण्यात भेट घेतली. तसेच नवनाथ कांबळे यांना श्रध्दांजली म्हणून कोणताही राजकीय पक्ष या जागेसाठी उमेदवार उभा करणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. राष्ट्रवादी पक्षानेही त्यास समर्थन दिल्याचे रिपाईच्या शिष्टमंडळाने पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर शहराध्यक्षा चव्हाण यांच्याशी चर्चा करतो, असे पवार यांनी सांगितले.
भाजप असल्यास राष्ट्रवादी रिंगणात, कोरेगाव पार्क पोटनिवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 5:05 AM