लसीकरणाच्या तिस-या टप्प्याला १ मार्चपासून सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालय वगळता इतरत्र कोव्हिशिल्ड लसच उपलब्ध करुन देण्यात आली होती. कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव, महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाकडील कोव्हिशिल्ड लसीचा साठा संपत आला असून, पुढच्या डोसचे नियोजन कसे करायचे, याचा पेच निर्माण झाल्याची चर्चा रविवारपासून सुरु झाली होती. सिरम इन्स्टिट्यूटकडून कोव्हिशिल्ड लसीचे पुरेसे डोस उपलब्ध करुन दिले जात आहेत. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसींचा तुटवडा निर्माण झालेला नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
----------------------
सध्या ज्या केंद्रांवर कोव्हिशिल्डचे लसीकरण सुरु आहे, तेच नियोजन कायम ठेवावे. एकाच केंद्रांवर दोन्ही लसी उपलब्ध करुन दिल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नव्याने सुरु करण्यात आलेल्या केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लसीकरणाचे नियोजन करता येऊ शकते, असे सुचवण्यात आले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाकडे सध्या कोव्हिशिल्डचे २००० डोस शिल्लक आहेत. दररोज सरासरी ३००-३५० जणांचे लसीकरण होत आहे.
- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय