- राजू इनामदारपुणे : काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर संभाजी ब्रिगेड व शेतकरी कामगार पक्षाचे राज्य पदाधिकारी प्रविण गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची थेट बारामतीत जाऊन भेट घेतल्याने काँग्रेस निष्ठावंतांमध्ये खळबळ माजली आहे. गायकवाड हे पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची ऊमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक काँग्रेसजनांचा त्यांना तीव्र विरोध आहे.
गेल्या काही दिवसात गायकवाड यांच्या राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. दिल्लीत, मुंबईत त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचीही त्यांनी नुकतीच भेट घेतली व शनिवारी तर थेट शरद पवार यांचेच घर गाठले. पुण्यातून काँग्रेसची ऊमेदवारी मिळण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यांच्या या प्रयत्नांना बळ मिळावे या पद्धतीने काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हालचाली सुरू असल्याने स्थानिक काँग्रेस नेते, इच्छूक ऊमेदवार संतप्त झाले आहेत. पक्षाच्या पारंपरिक पद्धतीने इच्छुकांची नावे निश्चित करण्याची घटनात्मक प्रक्रिया पार पडल्यावर पक्षश्रेष्ठींनी पुन्हा दोन दिग्गज निरीक्षक पाठवून पुण्यात बैठक घेतली. त्यात तुमच्यात एकमत करा, नाहीतर पक्षश्रेष्ठी देतील तो ऊमेदवार मान्य करावा लागेल असे पुण्यातील नेत्यांना बैठकीत बजावण्यात आले. त्यानंतरच ही ऊमेदवार आयात करण्याची नांदी असल्याचे स्थानिक नेत्यांचे मत पक्के झाले आहे. त्याला तीव्र विरोध करण्याचा निर्णय त्यातील काही आक्रमक नेते, पदाधिकारी व इच्छुकांनी घेतला आहे. तत्पूर्वी गायकवाड किंवा कोणत्याही आयात ऊमेदवाराने पक्षाच्या पुण्यातील अस्तित्वाला कसा धक्का लागणार आहे ही बाब पक्षातील वरिष्ठांच्या निदर्शनास आणण्याचे ठरवण्यात आले आहे. मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याची ही जबाबदारी कोणा एकावर सोपवण्याऐवजी सामूहिकपणे घेण्याबाबत प्रयत्न केला जात आहे. जातीय विचारांचा, प्रतिगामी प्रतिमेच्या चेहरा असणाऱ्यांना ऊमेदवारी दिली तर समाजात असलेल्या मतपेढीला धक्का बसू शकतो. अनेकदा निर्णायक ठरणारी ही मते पक्षापासून दूर जातील हे पक्षश्रेष्ठींच्या मनावर ठसवण्यात येणार आहे.
याचा ऊपयोग झाला नाही व तरीही ऊमेदवार आयात केला तर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अभिनव आंदोलन करून ऊमेदवारी रद्द.करायला भाग पाडायचेच असे ठरवण्यात आले असल्याची माहिती मिळाली. वेळ पडली तर आपण यशवंराव चव्हाण पुतळ्यासमोर उपोषण करू अशी तयारीही एका नेत्याने दाखवली असल्याची चर्चा आहे.
पवार काेण काॅंग्रेसचा उमेदवार ठरवणारे ?मावळ व रायगड या दोन लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी ला शेतकरी कामगार पक्षाचीमदत हवी आहे. पुण्यात त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला ऊमेदवारी देण्याबाबत काँग्रेसवर दबाव टाकून ती द्यायला लावायची अशी शरद पवार यांची खेळी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच पवार कोण ? काँग्रेसचा ऊमेदवार ठरवणारे असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.