पुणे : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल अशी घोषणा काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच राज्यात काँग्रेस सध्या जरी चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. परंतु,२०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखविला होता. आता त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील राजगुरूनगर खेड येथे संजय राऊत हे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. राऊत म्हणाले, काँग्रेसने जर स्वबळावर लढून त्यांना हिंदुस्थानमध्ये स्वतःची सत्ता आणायची असेल तर त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. जर नाना पटोले किंवा अन्य कुणी जर काँग्रेस स्वबळावर लढून लोकसभेत २८५ चे बहुमत आणून सत्ता आणणार असतील तर नक्कीच आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून खेड राजगुरूनगर पंचायत समितीतील राजकारण चांगलेच तापले आहे. खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात दाखल केेलेला अविश्वास ठराव अकरा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला .२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली. त्या सदस्यांच्या बंडखोरीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची फूस असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी खेडमध्ये मोहिते पाटलांवर टीकास्त्र सोडले आहे.
तर राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना पाडून शिवसेनेचा आमदार आणणार... खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी ते लायकीचे नाही. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांना सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला माज आला असं म्हणतात. पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या अमिषाने पळवून नेले. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.तसेच आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. खेडच्या आमदाराची वागण्याची पद्धत हीच राहिली तर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल अशा शब्दात गर्भित इशारा दिला आहे.