"कोरोना आटोक्यात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाही..!"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 04:27 PM2020-09-11T16:27:49+5:302020-09-11T16:28:17+5:30

मुंबई सारख्या महानगरामध्ये कोरोना आटोक्यात येऊ शकतो तर पुण्यात काय अडचण आहे.

"If Corona is not in control, some officers will not be seen in Pune at the next meeting ..!" | "कोरोना आटोक्यात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाही..!"

"कोरोना आटोक्यात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाही..!"

Next
ठळक मुद्देअजित पवार यांचा प्रमुख अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा इशारा  

पुणे : मुंबई सारख्या महानगरामध्ये कोरोना आटोक्यात येऊ शकतो तर पुण्यात काय अडचण आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी असून, अधिकाऱ्यांना फ्री हॅन्ड दिल्यानंतर पुण्यात परिस्थिती का सुधारत नाही. येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाही, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुठे बदली करायची हे मला चांगलेच माहिती आहे. असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.
पुण्यातील विधानभवन सभागृहात शुक्रवार (दि.11) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त कृष्‍ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्याचे पालकमंत्री म्हणून सर्वस्वी जबाबदारी अजित पवार यांची असल्याने त्यांना राजकीय रोषाला सामोरे जावं लागत आहे. पुण्यातील कोरोनाची साथ झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी शुक्रवारी विधान भवन या ठिकाणी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये प्रशासनातील बडे बडे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनावर प्रचंड पकड असलेले नेते म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्याच्या स्वभावानुसार त्यांनी पुण्यात मोठे बदल देखील केले आहेत. परंतु त्यानंतर देखील परिस्थिती नियंत्रणात येत नाही. बैठकीत पवार म्हणाले, कोरोना आटोक्यात न आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे. कोरोना रोखण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत यासाठी राज्य सरकार आपल्या सदैव पाठीशी आहे.मात्र अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये. मला कामाचा हिशोब द्यावा लागेल या शब्दांमध्ये अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी सुनावले. त्यांना अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने ते चिडले यापुढे जर कामात सुधारणा दिसली नाही तर मला मोठी ऍक्शन घ्यावे लागेल असा सज्जड दमही त्यांनी अधिकाऱ्यांना भरला.

Web Title: "If Corona is not in control, some officers will not be seen in Pune at the next meeting ..!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.