पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे होर्डिंग लावण्यात आले होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. मात्र ऐकतील ते कार्यकर्ते कसे? पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करत एकमेकांना आव्हान दिले आहे.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, 'होर्डिंग लावण्यास मी सांगितले नव्हते. गुन्हेगार माझे होर्डिंग्स लावत असतील तर यात माझा काय दोष. आम्ही आवाहन करण्याचे काम केले होते. त्यामुळे कुणी चुकीचं काम केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी.' अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
''कार्यकर्त्याना कशाचीही बंदी नाही. मी अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये येतोय. त्यामुळे येथील नागरिकांना माझी मतं स्पष्टपणे माहिती आहेत. त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही. मी नियमांचे पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीचे लागले असतील, तर भाजपची येथे सत्ता आहे. भाजपने कारवाई करावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.''
वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीकडून जोरदार 'पोस्टरबाजी' द्वारे शक्तिप्रदर्शन
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पावधी सरकारच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे.
आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या उंबरठ्यावर पुण्यात फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीकडून जोरदार 'पोस्टरबाजी' द्वारे शक्तिप्रदर्शन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांनी देखील आपापल्या कार्यकर्त्यांना वाढदिवस साध्यापणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्या आवाहनाला फार गांभीर्याने न घेता कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जोरदार पोस्टरबाजी केली आहे.