पुणे :कोथरूड पुण्याची सांस्कृतिक राजधानी असली तरी तिची कागदपत्रे शनिवार वाडा आणि कसब्यात आहेत अशा शब्दात खासदार गिरीश बापट यांनी पुन्हा एकदा 'कसब्याचे' महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष कोथरुडमधून प्रतिनिधीत्व करत आहेत. अशावेळी बापट यांचे हे वक्तव्य जाणकारांच्या भुवया उंचावणारे ठरले हे मात्र निश्चित.
पुणे शहराच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांच्या सर्वपक्षीय सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, शिवसेनेचे शशिकांत सुतार, काँग्रेसचे रमेश बागवे, मनसेचे किशोर शिंदे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना बापट म्हणाले की, 'सर्वपक्षीयांनी एकत्रित काम करून जनतेचे प्रश्न सोडवायला हवेत. काम झाल्यावर त्याचा फायदा कोणत्याही पक्षाला नाही तर जनतेला होत असतो. पुण्यात भेडसावणाऱ्या पाण्याच्या, वाहतुकीच्या प्रश्नांवर मोहोळ काम करतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पुणे शहराबद्दल वेगळे आगळे आकर्षण आहे. कोथरूड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र, राजधानी असली तरी तिची कागदपत्रे मात्र शनिवारवाडा आणि कसब्यात आहेत'असेही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'आगामी काळात निवडणुका जिंकता येणार नाहीत, इव्हेन्ट मॅनेजमेंटवर नेता होता येणार नाही आणि राज्यही चालवता येणार नाही. प्रत्यक्ष सामान्य माणसाला विश्वास वाटला तर निवडून येता येईल. असा विश्वास फडणवीस यांच्या बद्दल जनतेला वाटला आणि त्यामुळे वसंतराव नाईकांप्रमाणे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले. शेवटच्या दिवशी पैसे वाटून काही होणार नाही असेही ते म्हणाले.