लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी बाधितांसाठी विलगीकरण कक्ष असलेले तब्बल २१३ डबे तयार केले होते. मात्र, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार होती. त्यामुळे बहुतांश ठिकाणी या सुविधेचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे नंतर रेल्वेने हे डब्बे पुन्हा सर्वसाधारण प्रवाशांसाठी वापरण्यास सुरुवात केली. आता कोरोनाच्या दुसर्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने रुग्णालये फुल्ल झाली आहे. मात्र, पुण्यात सध्या ही आयसोलेशन ट्रेन उपलब्ध नाही. जिल्हा प्रशासनाने मागणी केल्यास ८ दिवसांत आयसोलेशन ट्रेन उभारण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.
पुणे शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढला असून हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही. हे पाहून रेल्वेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला एक आठवड्यापूर्वी अशा आयसोलेशने डब्यांबाबत विचारणा केली होती. तेव्हा गरज नसल्याचे सांगण्यात आले होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी मध्य रेल्वेने २१३ विलगीकरण कक्ष असलेले डब्बे तयार केले होते. ही रेल्वे विविध रेल्वे स्थानकावर उभी राहून तेथे सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना ठेवण्याची योजना होती. तेथे जिल्हा प्रशासनाने वीज, पाणी आणि डॉक्टर व आरोग्य कर्मचारी पुरवावे, अशी रेल्वेची अपेक्षा होती. पुणे शहरात असे पाच डब्बे तयार केले होते. त्यात सुमारे ४५० बाधितांची सोय होऊ शकली असती. रेल्वेने आपल्याकडे अशी विलगीकरणाची सोय असलेली रेल्वे उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाला सांगितले होते. पहिल्या लाटेच्यावेळी ही सुविधा अगदीच गरज लागली तर सर्वात शेवटी वापरण्याचा पर्याय ठेवला होता. मात्र, त्यानंतर शहरात जब्बो कोविड सेंटर सुरु झाल्याने ही सुविधा वापरण्याची वेळ आली नाही. त्यानंतर कोरोना लाटेचा प्रभाव ओसरत गेला.
रेल्वेचे डबे हे दर वर्षा-सहा महिन्यांने देखभालीसाठी वर्कशॉपमध्ये पाठविले जातात. अशावेळी हे खास डबे देखभालीनंतर नेहमीच्या प्रवाशांच्या वापरासाठी पाठविले आहे. त्यामुळे सध्या पुणे रेल्वेकडे आयसोलेशन ट्रेनचा एकही डबा तयार नाही.
---
कोरोनाची दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेऊन आयसोलेशन ट्रेनबाबत मध्य रेल्वेने प्राथमिक तयारी केली आहे. जर जिल्हा प्रशासनाने रेल्वेकडे मागणी केल्यास ८ दिवसात असे डबे तयार करुन देण्याची रेल्वेची तयारी आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग