पुणे: देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असताना, हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत. त्यात विना मास्क फिरणा-या शेकडो-हजारोंची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत. असे असताना वारक-यांच्या उपासनेच्या या मुलभूत अधिकारावर गदा का आणण्यात येत आहे ? महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना वारीला विरोध का करण्यात येत आहे. कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने फक्त शिस्तप्रिय वारक-यांवर का लादली जात आहेत ? असा सवाल उपस्थित करत पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. तर विश्व हिंदू परिषद शासकीय कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करणार असा इशारा परिषदेचे महाराष्ट्र गोव्याचे क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
प्रत्यक्षात वारीबाबत वारक-यांच्या माफक मागण्या आहेत. सुमारे ७०० वर्षांची पायी वारीची परंपरा आहे. यावर्षी संत तुकाराम महाराजांचा ३६६ वा पालखी सोहळा आहे. संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज या प्रमुख संतांच्या पालख्यांसह इतर पूजनीय संतांच्या पालख्या ही पंढरपुरात दाखल होत असतात. या पालख्यांसोबत असंख्य दिंड्या असतात. या प्रत्येक दिंडीतील किमान २ वारक-यांना (विणेकरी सह टाळकरी) यांना वारी करू द्यावी. मानाच्या प्रत्येक पालखी सोबत किमान ४० ते ५० वारक-यांना वारी करण्याची परवानगी द्यावी. यात फक्त दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांनाच कोरोनाचे नियम पळून आरटीपीसीआर तपासणी करून प्रवेश द्यावा.
महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी वारकरी - संत समाज येणा-या काळात रस्त्यावर उतरणार
शनिवार १७ जुलैला रोजी जिल्हाधिकारी, शासकीय कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. लाक्षणिक उपोषण, आंदोलन, कीर्तन-भजन असा साखळी पद्धतीने कार्यक्रम होणार आहे. लवकरात लवकर सरकारने वारक-यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. तसेच या नंतरही साधू संतांची, वारक-यांची होणारी अवहेना न थांबल्यास संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी वारकरी - संत समाज येणा-या काळात रस्त्यावर उतरेल, असे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.