लोणी काळभोर : ऊरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीतील नागरिक शनिवार व रविवार या दोन दिवसांत नाहक घराबाहेर पडले तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा लोणी काळभोर पोलीसांचे कारवाईस सामोरे जावे लागेल. असा इशारा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ब्रेक द चैन या मोहिमेंतर्गत शुक्रवार ९ एप्रिल सायंकाळी ६ ते सोमवार १२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत पुणे महानगरपालिकेप्रमाणेच शहरालगतच्या लोणी काळभोर व लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी लोणी काळभोर पोलीसांनी काटेकोरपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना मोकाशी पुढे म्हणाले की लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी ठाण्याच्या हद्दीत ब्रेक द चैन या मोहिमे अंतर्गत पुढील ६० तास अत्यंत काटेकोरपणे जनता कर्फ्यू राबवण्याचा निर्णय पोलीसांनी घेतला आहे. या काळात मेडिकल, किराणा दुकान, दूध विक्री अशा अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व प्रकारचे व्यवसाय बंद राहणार आहेत.
सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत रिक्षा, बस, टॅक्सी, खाजगी वाहने व सार्वजनिक वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या काळात ॲम्बुलन्स शिवाय एकही वाहन रस्त्यावर येणार नाही. याची पोलीस यंत्रणा काळजी घेणार आहे. या काळात गरज नसताना वाहने रस्त्यावर आणल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल असे मोकाशी यांनी शेवटी सांगितले.