पुणे: मी ३५ वर्ष जमिनीचे व्यवहार करतो.एकही प्रॉपर्टीची केस नाही. सहा वर्षात कोणावर अन्याय केला असेल तरी सांगावे. मात्र, गजानन मारणे प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी राष्ट्रवादी पक्षाशी निगडित असून देखील मला अटक करून चौकशी करण्यात आली. पालकमंत्र्यांशिवाय अटक होऊ शकत नाही.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतो तर मला अटक झाली नसती, असा गौप्यस्फोट भाजप नेते संजय काकडे यांनी केला आहे.
संजय काकडे यांची नुकतीच भाजप च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत होते. काकडे म्हणाले, मुख्यमंत्री मुंबईचा, उपमुख्यमंत्री पुण्याचा परंतू, याच ठिकाणी सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. याचाच अर्थ परिस्थिती नियंत्रणात नाही.काही झालं की केंद्र सरकारवर ढकलून मोकळे व्हायचं एवढंच काम राज्य सरकार करत आहे. आरक्षणाबाबतीत तेच,काय चाललंय राज्यात कळत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्य सरकार म्हणून यापुढे तुम्ही काय करणार याचं उत्तर दिले पाहिजे. मुंबई, पुण्यातील सर्व नागरिकांना लस द्यायला हवी. जेणेकरून सर्व उदयोग व्यवस्थित सुरू होतील.
राज्य सरकारने नियोजन केले पाहिजे. या सरकारमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. सगळ्या गोष्टी केंद्रावर ढकलून कसे चालेल. आपलं राज्य मोठे आहे.इथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणला पाहिजे. राजकारण करायला बाकी सर्व आयुष्य पडलं आहे, असेही काकडे यांनी यावेळी सांगितले.
पंढरपूर मंगळवेढा येथे महाविकास आघाडी एकत्र असताना आमच्या उमेदवाराचा विजय झाला असाही टोला त्यांनी लगावला आहे.
पुढे काकडे म्हणाले,पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त करतो.आणि येणाऱ्या काळात पक्षासाठी जे जे काही करायचं असेल ते नक्की करेन.
-