"जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हा प्रसंग आला नसता.."; अजित पवारांचा नारायण राणे यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 08:50 PM2021-08-27T20:50:38+5:302021-08-27T20:50:51+5:30
नारायण राणे यांच्यावर पोलिसांनी लगेच कोणतीही कारवाई केली नव्हती.
पुणे : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात जोरदार शाब्दिक चकमकी देखील घडलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. मात्र, आता या राणेंच्या अटक कारवाईवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केले आहे.
पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
पवार पुढे म्हणाले, पोलिसांनी लगेच कोणती कारवाई केली नव्हती. त्यांचे काही लोकं कोर्टात गेले आणि कोर्टानं नाकारले. हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. ते झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या.”प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या चौघांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग आहे. प्रत्येकाने जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हे प्रसंग आले नसते.”, असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अजित पवार यांनी सांगितलं.
सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?
निधी द्यायचा झाला तर गडकरी साहेबाचं खातेही देऊ शकते. आणि यापूर्वी त्यांनी निधी देखील दिला आहे. त्यानुसार कामे पण सुरु आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? अशा शब्दात पवारांनी राणे यांच्यावर निशाणा साधला.