शिरुर तालुक्यातील पूर्व भागात फार मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूविक्री, जुगार, मटका, गुटखाविक्री, सुगंधी तंबाखूविक्री, ढाब्यावर अवैध दारूविक्री असे अवैध धंदे सुरू होते. याबाबत पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. त्यामुळे फौजदार जगदाळे यांनी या भागात कारवाई सुरू केली आहे. मागील महिन्यात तब्बल २२ ठिकाणी दारूच्या हातभट्ट्या नष्ट करून २२ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या परिसरातील सर्वच अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. परिसरात चालणारा जुगार, मटका यावर सुध्दा कारवाई केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीत काम करणारे मजूर, गरीब व्यक्ती ज्यांना दारूचे व्यसन आहे असे अनेकजण हातभट्टीची दारू पिण्यासाठी दारूच्या गुत्यावर गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी फौजदार जगदाळे यांनी इनामगाव (ता. शिरूर) येथील सर्व हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या व्यक्तींना सी. आर.पी. सी १४९ प्रमाणे नोटीस दिल्या आहेत. जर हे धंदे बंद केले नाही तर सदर व्यक्तीला तडीपार करण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.