छत्रपती संभाजीराजेंनी घेतली छत्रपती उदयनराजे यांची भेट
दोन छत्रपतींची पुण्यात भेट : छत्रपती उदयनराजे यांचे आवाहन
पुणे : “लोकशाहीतील ‘राजे’ नीट वागत नसतील तर त्यांना ‘आडवा आणि गाडा’. सरकारला देशाची फाळणी करायची आहे का? मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे,” अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.
सोमवारी (दि. १४) पुण्यात औंध येथे छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
उदयनराजे यांनी सांगितले की, व्यक्तिगत स्वार्थासाठी कधी दुफळी निर्माण होईल असे काही कृत्य केले नाही. आंदोलन वगैरे का होते? आरक्षण द्यायचे असते तर राज्यकर्त्यांनी ते मागेच दिले असते. राजकारण व्यक्तीकेंद्रित झाले आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण द्या. समाजाचा उद्रेक होईल अशी वेळ येऊ देऊ नका. मराठा समाजाचा उद्रेक झाला तर आम्ही काही करू शकणार नाही.
भूतकाळाचा विचार करायला पाहिजे, असे म्हणत हे का झाले? असा प्रश्न छत्रपती उदयनराजे यांनी व्यक्त केला. निवडून यायचे असल्याने त्यांना सोईच्या असलेल्या समाजाचा ते फायदा करून देतात. लोकशाहीतले राजे नीट वागत नसेल, तर त्यांना आडवा आणि गाडा. माझ्यापासून सुरुवात करा. मला प्रश्न विचारा, असेही ते म्हणाले.
“छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे,” असे छत्रपती उदयनराजे यांनी सांगितले. प्रत्येकाचे विचार एकसारखे असावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. गायकवाड आयोगाचा अहवाल यांनी वाचलाच नाही. यात पक्ष आणू नका. हे सगळ्या पक्षांना लागू होते. इथे प्रश्न समाजाचा आहे. आरक्षण प्रश्न ही राज्याची जबाबदारी आहे. सभागृहात एक बोलतात आणि बाहेर वेगळे. विशेष अधिवेशन होऊ द्या. मग बघू, असे उदयनराजे यांनी सांगितले.
चौकट
...हे रक्तात नाही
संभाजीराजे यांनी सांगितले की, सातारा आणि कोल्हापूर ही दोन घराणी एकत्र आली, एकमेकांची भेट घेतली, याचा आनंद आहे. आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. राज्य सरकारने सहा मागण्या मान्य कराव्यात. अधिवेशनातून अनेक विषय मार्गी लागू शकतात.
चौकट
शाहू महाराज-पवार भेटीची कल्पना नाही
शाहू महाराज आणि अजित पवार यांच्या भेटीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. “शाहू महाराज आणि अजित पवारांच्या भेटीबद्दल मला कल्पना नव्हती. ते आशीर्वाद घ्यायला आले असतील. त्यातून जर काही निघणार असेल तर आनंद आहे,” असे ते म्हणाले.