मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधात शेतीशी निगडित व्यवसाय, बाजारपेठ तसेच माल वाहतुकीला निर्बंध घातल्याने शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात ना शेतमाल नीट पिकविता आला? ना शेतमाल विक्रीला बाजारपेठ मिळू शकली. लॉकडाऊनमध्ये शेती निगडित फर्टीलाझर , पाईपलाईन साहित्य विक्रीची दुकाने बंद राहिल्याने शेतीतील नवीन कामेच बंद राहिली नाहीत तर चालू कामे साहित्याअभावी बंद ठेवावी लागली केवळ साहित्य, बियाणे , खते , औषधे नाही म्हणून शेतीचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना जनावरे व मजुरांचा आर्थिकभार विचारात घेता शेतकऱ्यांचे लॉकडाऊनच्या निर्बंधापायी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अशातच आता राज्य सरकारने थकीत वीजबिल माफीचा दिलेला शब्द फिरवला व चालू वीज कनेक्शन तोडण्याचाच सपाटा लावल्याने थकीत वीज बिल भरण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच पुन्हा लॉकडाऊनची शक्यता गृहीत धरता शेतकऱ्यांना निर्बंध लावल्यास शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. शेतकरी उन्हाळी हंगामात भाजीपाला पिके घेण्यात आग्रही असतात मात्र शेतकऱ्यांवर पुन्हा निर्बंधाची कुऱ्हाड कोसळल्यावर शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्याचे नियोजन कोसळणार असल्याने शेतकऱ्यांना लॉकडाऊनमधून मुक्तता मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे.