पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाला अटकाव करण्याकरिता काळजी घेणे आणि खबरदारी बाळगणे आवश्यकच आहे. मात्र, कोरोना रोखण्याकरिता ‘लॉकडाऊन’ हा उपाय ठरु शकत नाही. पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्यास ‘अर्थचक्र’ उद्ध्वस्त होईल. तसेच रोजगाराचा प्रश्नही भीषण रुप धारण करेल. त्यामुळे नागरिक आणि व्यापारी दोघांनीही नियमांचे पालन करणे आणि एकमेकांना सुरक्षित ठेवणे हाच उपाय असल्याचे मत विविध व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.
राज्यामध्येच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यातही रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. रविवारी तर कोरोना रुग्णांचा आकडा ६३४ वर गेला होता. रविवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन कडक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, रात्री ११ ते पहाटे सहा संचारबंदी, शाळा-महाविद्यालये-खासगी क्लासेस आठ दिवसांकरिता बंद, हॉटेलच्या वेळा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लॉकडाऊन लागल्यास सर्वाधिक फटका हा उद्योग विश्वाला बसणार आहे. बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा सर्व बंद झाल्यास फार मोठा फटका बसू शकतो. लोकांना मिळत असलेला रोजगार बंद होईल. त्यामुळे व्यापारी महासंघाने व्यापा-यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
====
कोरोनाला रोखायचे असल्यास खबरदारी हाच एकमेव उपाय आहे. मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर असे नियम पाळल्यास रुग्णसंख्या कमी होऊ शकते. लॉकडाऊन कोणालाही परवडणारे नाही. आम्ही एक आॅडीओ क्लिप तयार करुन ती सर्व व्यापा-यांना पाठविली आहे. काळजी घ्या, अन्यथा पुन्हा सर्व बंद होईल, असेही नमूद केले आहे.
- महेंद्र पितळीया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ
====
योग्य खबरदारी घेत व्यवहार सुरु ठेवायला हवेत. व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांना शासनाला कर भरावे लागत आहेत. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. शासकीय यंत्रणांनाही कामांसाठी उत्पन्न लागतेच. लॉकडाऊन लागल्यास पुन्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. उद्योग-धंदे, आॅफिस-हॉटेल्स सुरु राहावेत. मात्र, सर्व निकषांचे काटेकोर पालन होणे गरजेचेच आहे.
- किशोर सरपोतदार, सचिव, पुणे हॉटेलियर्स असोसिएशन
--------
कोरोनाची आकडेवारी
कोरोनाचे एकूण रुग्ण - १, ९८, २९२
बरे झालेले एकूण रुग्ण - १, ९०, ५६०
एकूण मृत्यू - ४, ८३०
एकूण चाचण्या - ११, ०३, ५४८
--------
अशी वाढली आठवड्यातील संख्या
दिनांक रुग्ण मृत्यू
१५ फेब्रुवारी १९३ ०२
१६ फेब्रुवारी ३०९ ०१
१७ फेब्रुवारी ४२८ ०४
१८ फेब्रुवारी ४६५ ०६
१९ फेब्रुवारी ५२७ ०४
२० फेब्रुवारी ४१४ ०५
२१ फेब्रुवारी ६३४ ०५
२२ फेब्रुवारी ३२८ ०४