लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चक्रीवादळात गुजरातमध्ये नुकसान झाले तसे महाराष्ट्रातही झाले. किनारपट्टीवरील तमिळनाडू, कर्नाटकलाही फटका बसला. परंतु गुजरातचा प्रस्ताव नसूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधानांनी गुजरातसोबतच महाराष्ट्र व अन्य राज्यांनाही मदत जाहीर केली असती तर बरे झाले असते, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले.
पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर पवार शुक्रवारी (दि.२१) पत्रकारांशी बोलत होते. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी पंतप्रधान मोदी प्रथम मुंबईत येणार होते. त्यानंतर गुजरातला जाणार होते, परंतु त्यात बदल करून पंतप्रधान गुजरातला गेले. याबद्दल पवार बोलत होते.
पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी सध्या पुण्यातील लाॅकडाऊनमध्ये कोणताही बदल करणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील लाॅकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे देखील त्यांनी सांगितले. शाळा सुरू नसताना शिक्षण संस्थांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कासंदर्भात समन्वयाने मार्ग काढून. शाळा भरली नसेल तर संस्थेने विद्यार्थी आणि पालकांवर अन्याय करू नये, असे पवार यांनी सांगितले.
पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याऐवजी प्रत्यक्ष उपस्थितीची परवानगी देण्यासंदर्भात शासन विचार करेल, असे ते म्हणाले.