लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाजपबरोबरचा घरोबा संपवून शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केले. हा घाव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. तेव्हापासून भाजप आणि शिवसेनेत सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, मंगळवारी शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतली आणि राजकीय चर्चांना जोर आला. शिवसेनेवर टीका करण्यात आघाडीवर असणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नरमाईच्या सुरात स्पष्ट केले की, नरेंद्र मोदींनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू. बुधवारी (दि. ९) पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांना वाघाची प्रतिकृती भेट देण्यात आली. त्याचा संदर्भ देत पाटील म्हणाले, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती.” उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. तसेच फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर अठरा महिन्यांपूर्वीच सरकार आले असते. मात्र मोदींनी सांगितले तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. नेत्याचा आदेश म्हटल्यावर आम्ही वाट्टेल ते करू. पण तसे काही जरी घडले तरी निवडणुका ह्या स्वतंत्रपणेच लढविणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
चौकट
त्या ६ हजार कोटींच्या चेकचं काय?
“राज्य सरकारने १२ कोटी कोरोना लसी सहा हजार कोटी रुपये एकरकमी चेक देऊन खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. मात्र, केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ वर्षांपुढील सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचे सहा हजार कोटी रुपये वाचले आहेत. मागच्या पाच वर्षांत खिशात आमदारकीचे राजीनामे घेऊन फिरणारे लोक ह्यावेळी १२ कोटी लसींच्या खरेदीचा सहा हजार कोटींचा चेक खिशात घेऊन फिरत होते. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर या ६ हजार कोटींचे काय करणार ते? मराठा समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वापरणार? चक्री वादळात नुकसान झालेल्यांना वाटणार की कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या दुर्बल घटकांच्या खात्यात जमा करणार का, असा प्रश्न पाटील यांनी विचारला.