नरेंद्र मोदी सत्तेत आले, तर निवडणुका होणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 06:14 AM2019-04-02T06:14:02+5:302019-04-02T06:14:31+5:30
पृथ्वीराज चव्हाण; राफेलबद्दल जाब विचारा
पुणे : देशातील सर्वात मोठ्या राफेल घोटाळ्यामधील भ्रष्टाचार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीने झाला आहे. ‘चौकीदार’ म्हटले की चोर आणि चोर म्हटला की राफेल समोर येते. जगाच्या संरक्षण क्षेत्रातल्या या घोटाळ्याबद्दल मतपेटीतून जाब विचारला पाहिजे आणि मोदी सरकारला फेकून दिले पाहिजे. हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर लोकशाही आणि संविधान राहणार नाही. आगामी काळात निवडणुका होणार नाहीत. मोदी हुकुमशहा बनले आहेत. ही निवडणूक वैयक्तिक मोदी यांचा पराजय करण्याची आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
एका पुस्तकाचे प्रकाशन माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. लेखक आणि पत्रकार परंजोय गुहा ठाकूरदा, सुरेश जोंधळे, कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर उपस्थित होते. राफेल प्रकरणात मोदी यांनी कशाप्रकारे हस्तक्षेप केला या संपूर्ण घोटाळ््याचा इतिवृत्तांत चव्हाण यांनी कथन केला. निवडणुकीत मुख्यमंत्री आणि त्यांचे बॉस अमित शहा यांच्याकडून साम, दाम, दंड, भेदचा अवलंब केला जात आहे. पंतप्रधानांनी देशाच्या विकासावर बोलले पाहिजे. गेल्या पाच वर्षात काय केले त्यावर बोलण्यापेक्षा मोदी वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांच्या भाषणातून ‘विकास’ शब्दच हद्दपार झाला आहे. त्यामुळे निवडणूक पुन्हा विकासाच्या मुद्द्यांवर नेली पाहिजे.
दहशतवादी अधर्मीच
दहशतवादी हा दहशतवादी असून, तो कोणत्याही जात-धर्म-पक्षाचा असला तरी त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. राज्यात चार सहिष्णुतावाद्यांच्या हत्या झाल्या असून त्यांचा शोध घेणार की नाही, असा सवालही त्यांनी केला.