पुणे : सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांतील वाद विकोपाला जाताना दिसतोय. राजकारण्यांच्या वादात अनेकदा सामान्यांना मोठा फटका बसतो. त्याचेच एक उदाहरण म्हणजे आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांनी राजीनाम नाही दिला तर विधीमंडळाचे अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. कोरोनातून सावरत असताना राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत.
सध्या मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यातील मंत्री नवाब मलिकांना ईडीने अटक केली आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील कोल्हापुरात म्हणाले, देशद्रोही गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा उद्या बुधवारी २ मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) घेतील अशी अपेक्षा आहे. पण राजीनामा घेतला नाही तर भारतीय जनता पार्टी विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा पाटील (chandrakant patil) यांनी दिला.
पाटील म्हणाले की, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिने तीनशे कोटींची मालमत्ता बळकावली व ती तांत्रिकदृष्ट्या नवाब मलिक यांच्या कंपनीच्या मालकीची असल्याचे दाखविले. दाऊदसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या गंभीर आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने नवाब मलिक यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने पुराव्यांचा विचार करून अधिक तपासासाठी मलिक यांना ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रिमोट कंट्रोलने महाविकास आघाडी सरकार चालविणारे शरद पवार हे तातडीने नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा होती.