हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणा; अजित पवारांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 03:19 PM2022-05-06T15:19:36+5:302022-05-06T15:23:05+5:30
सगळ्यांनी हाय कोर्ट, सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं असतं. सर्वानी आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे
पुणे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणांच्या घोषणेनंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. अखेर राणांनी आपली घोषणा मागे घेतली, पण त्यानंतर पोलिसांनी राणांना अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कालच त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे. आज अजित पवारांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. जर कोणाला हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणावी. असा सल्ला त्यांनी दिला आहे.
पवार म्हणाले, सगळ्यांनी हाय कोर्ट, सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं असतं. सर्वानी आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असाल तर अजिबात चालणार नाही. कोणाला जर हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणावी. जर तुम्ही दुसऱ्याच्या दारात जाऊन म्हणत असाल तर तो त्रास देणंच आहे. हम करे सो कायदा नाही चालणार, अल्टिमेटम तर अजिबात चालणार नाही. असं नाव न घेता राणा दाम्पत्यांबरोबर पवार यांनी राज ठाकरेंनाही टोला लगावला आहे.
सगळ्यांच्याच धार्मिक स्थळांबाबत आपण नतमस्तक होतो
साधं दुधाच्या धारा काढायला बाहेरचे लोक येतात. आपल्याकडे लोक मशीन लावतात. आज सकाळीच पोलिसांसोबत माझी बैठक झाली, नियम काय आहे की सकाळी 6 ते 10 आहे. हे सगळं चाललंय ते थांबलं पाहिजे, सगळ्यांच्याच धार्मिक स्थळांबाबत आपण नतमस्तक होतो. आपल्याकडे आठ आठ दिवस रात्री उशीरा सप्ताह चालतात. बंद करायचं तर सगळंच बंद करावं लागेल. पण आता कोणीही असो तो जर कायदा मोडत असेल तर अजिबात मी ऐकणार नाही. बोलणारे बोलतात, गॅलरीतून इकडे तिकडे बघतात, आणि बाजूला राहतात. आज आपल्यापुढे वेगळे विषय आहेत, कारण नसताना नको ते विषय लोकांच्या मनात घालायचं काम सुरुये. कोणाला भोंगे लावायचे आहेत त्यांनी किती डेसीबील मध्ये चे नियम आहेत ते बघून, परवानगी घेऊन लावावं.