पुणे : संस्था नेहमी दुर्लक्षित राहतात. आजच्या काळात संस्था जगवण्याची गरज आहे. त्यांना बळ दिले तरच खेळाडूंचे पीक निर्माण होईल, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.सिम्बायोसिस स्पोर्ट सेंटरच्या आदर्श क्रीडा संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ शं. बा. मुजुमदार, स्पोर्ट सेंटरचे संचालक डॉ. सतीश ठिगळे, उपाध्यक्ष डॉ ए. बी. संगमनेरकर, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.पवार यांनी आपल्या भाषणात क्रीडा संस्थांशी निगडित अनेक अनुभव सांगितले. खेळ, खेळाडू, खेळाचे नियम, खेळाडूंचे नियम यापासून आम्ही दूर असतो. त्या क्षेत्रातील जाणकारांनी त्यासंबंधीचे निर्णय घ्यावेत. मात्र त्यांना समाजाचा आश्रय मिळवून देण्याची जबाबदारी आपण घ्यावी असा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना खो-खो सारखा खेळ शरीरसंपदा आणि बुद्धिमत्ता यांचा मेळ घालणारा आहे परंतु हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर तितकासा नावाजला गेला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असणाºया आणि अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवणाºया संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर, सन्मित्र संघ क्रीडामहर्षी हरिभाऊ साने क्रीडा संकुल, महाराष्ट्रीय मंडळ, नवमहाराष्ट्र संघ, दाजीसाहेब नातू बॅडमिंटन प्रमोशन फाउंडेशन या संस्थांचा समावेश होता. याशिवाय क्रीडा क्षेत्रात आंतराराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाºया मुरलीकांत पेटकर यांनाही सन्मानित करण्यात आले. डॉ मुजुमदार म्हणाले की, या संस्था स्थापन होऊन अनेक वर्षे उलटली आहेत, मात्र आजही संस्थापकांची नावे कोणाला माहिती नाहीत.या निमित्ताने त्यांची आठवण व्हावी हा या पुरस्कारामागचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक हित जपण्याकरता या संस्था स्थापन केल्या असून, त्यांच्या वारसदारांनीही हा वारसा जपल्याचा उल्लेखही त्यांनी केला.पेटकर यांनी सन्मानाला उत्तर देताना मी दिव्यांग असताना विश्वविक्रम करू शकतो तर विद्यार्थी का करू शकत नाहीत, अशा शब्दांत तरुण खेळाडूंचे मनोबल वाढवले.
संस्था जगल्या तर खेळाडू घडतील - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:11 AM