उंब्रज येथील आयोजित पत्रकार परिषदेस शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे, जुन्नर तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, उपाध्यक्ष अजीत वाघ उपस्थित होते.
सर्वच पक्षांनी सत्तेवर येताना शेतकऱ्यांना मोफत वीज आणि कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. परंतु, सत्ता मिळाल्यानंतर या दोन्ही प्रश्नांना बगल देण्यात आली. कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण देश ग्रासला अनेकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. शेतकऱ्यांची तर दयनीय अवस्था झाली आहे. दुसरीकडे शेतकरीकडे नैसर्गिक संकटांचाही सामना करत आहेत. त्यातच आता महावितरणने थकबाकीदारांची वीज जोडणी तोडण्याचे काम सुरू केले आहे. महामारीमुळे लाॅकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या असताना वीज तोडणी करून सरकार कायद्याचा भंग करीत आहे. यापूर्वी औरंगाबाद खंडपीठामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने सन २०१०- २०११ मध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती त्याचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला असताना निकालांमध्ये स्पष्ट म्हटले आहे की कोणत्याही शेतकऱ्यांची वीज तोडणी शासनाने करू नये असे असताना कायदा हातात घेऊन शेतकऱ्यास त्रास देण्याचे काम महावितरण कंपनीमार्फत केले जात आहे.
शासनाच्यावतीने विद्युत वितरण कंपनीने न्यायालयात आम्ही कोणत्याही शेतक-यांची वीज जोडणी तोडणार नाही, असे प्रतिज्ञापत्र करून दिलेले असताना कायद्याचा भंग करून आज सर्रास शेतक-यांची वीज तोडणी करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. तरी तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.