पुणे : प्रत्येकाने आपल्या शाळेला भेट दिली तर पूर्वीच्या समस्या अजूनही तेथे कमी अधिक प्रमाणात कायम असल्याचे दिसून येईल. त्यामुळे प्रत्येकाने या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. सर्वांनी आपापल्या गावातील समस्या सोडविल्या तर देशातील समस्या दूर होण्यास प्रयत्न होईल आणि देशाच्या विकासाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांनी बुधवारी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित जीवनसाधना गौरव पुरस्काराचे वितरण समारभ प्रसंगी डॉ. कोल्हे बोलत होते. विद्यापीठातर्फे उच्च शिक्षण व शैक्षणिक प्रशासन क्षेत्रातील कामगिरीबद्दल डॉ. आर. एस. माळी यांना तर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. प्रशांत होरे यांना, सांस्कृतिक क्षेत्रासाठी सुधीर गाडगीळ यांना आणि शैक्षणिक व साहित्यिक कामगिरीसाठी डॉ. न. म. जोशी यांना पुरस्कार दिले. तसेच विदीत गुजराथी, तन्मय देवचक्के, हृषीकेश पाळंदे, डॉ. स्नेहल शेकटकर आणि डी. भालचंद्र पुजारी यांना युवा गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.
आर. एस. माळी म्हणाले, विद्यार्थी म्हणून जेथे शिक्षण घेतले आणि शिक्षक म्हणून काम केले, त्याच विद्यापीठाकडून सन्मानित केले जात असल्याने आनंद होत आहे. तसेच प्रत्येकाने फळाची अपेक्षा न करता अखंडपणे प्रयत्न करत रहावे. निश्चितच त्यांना यश प्राप्त होईल.
प्रशांत हिरे म्हणाले, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिरे कुटुंबियांनी जे काम केले त्याचा परिपाक म्हणजे विद्यापीठाने केलेला हा सन्मान आहे, असे मी समजतो.
न. म. जोशी म्हणाले, विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्कार देवून माझ्या कपाळी विद्यादेवीचा टिळा लावला आहे. शिक्षण घेतलेल्या विद्यापीठाकडूनच सन्मान होत असल्यामुळे खूप आनंद होत आहे.
सुधीर गाडगीळ म्हणाले, पुरस्कार स्वीकारताना मला माझ्या पत्नीची आठवण येत आहे. तिच्यामुळे मी नोकरी सोडून निवेदन व मुलाखत क्षेत्रात मुक्तपणे काम करू शकलो. मला सर्वच क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती घेता आल्या. तसेच मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला दुय्यम न समजता त्याचा सन्मान करून बोलते केले पाहिजे.
दरम्यान, या कार्यक्रमात विद्यापीठातील व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील गुणवंत वरिष्ठ अधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पारितोषिक देण्यात आले.