पिंपरी : नोकरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबईमध्ये 'नाइट लाईफ' सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रस्ताव आल्यास पुण्यात देखील 'नाइट लाइफ' बाबत विचार करू, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
पिंपरी-चिंचवड येथे एका खासगी कार्यक्रमात शनिवारी रात्री आले असताना ते बोलत होते. मुंबई येथे रात्रभर वर्दळ सुरू असते. प्रवास करून कामावरून रात्री उशिरा घरी परत येणाऱ्या नागरिकांना खरेदी करता यावी, भूक लागली असल्यास त्याला जेवण सहज उपलब्ध व्हावे यासाठी रात्री देखील शॉपिंग मॉल, दुकाने, हॉटेल सुरू असणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असून शासनाच्या उत्पन्नात वाढ होईल. पुण्यात देखील कामगार, कष्टकरी मोठ्या संख्येने आहेत. त्यांनाही अशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. त्याबाबत प्रस्ताव आल्यास पुण्यात देखील 'नाइट लाइफ' सुरू करण्याबाबत विचार करू, असे आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले.
नुकताच मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरु करण्याबाबत विचार सुरु असून याचा फायदा राेजगार निर्मितीसाठी सुद्धा हाेईल असे सांगितले जात आहे. पुण्यातही अनेक आयटी कंपन्या असून रात्री उशीरा कामावरुन घरी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नाईट लाईफ सुरु करण्यासाठी पुण्याचा देखील विचार केला जात आहे.