बारामती - विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या संकल्पनेतून स्वतंत्र पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी सुरू आहे. ती यशस्वी झाल्यास विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारला या प्रयोगाच्या अंमलबजावणीबाबत विनंती करण्यात येईल. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मॉडेल म्हणून राज्याला करावे लागेल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.शारदानगर येथे पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा शिक्षण परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०१७-१८ चे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते. पवार यांच्या भाषणाच्या सुरुवातीला सासवड येथील आनंद काटे या विद्यार्थ्याने पवार यांना थेट व्यासपीठावर जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत पत्र दिले. या पत्राचा संदर्भ घेऊनच पवार यांनी भाषणाला सुरुवात केली.पवार म्हणाले, की देशात योगदान देणारे चांगले खेळाडू, कलाकार अशा स्पर्धांमधून पुढे येतील, याची खात्री आहे. जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्याचे बळ खेळातूनच मिळते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवावेत. मात्र, विद्यार्थी घडविताना आपण चारित्र्यसंपन्न आहोत का, याचे आत्मपरीक्षणदेखील करावे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते म्हणाले, की शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या खेळाला वाव मिळावा. त्यातून अर्जुन पुरस्कार विद्यार्थी घडावेत, अशी आजच्या कार्यक्रम आयोजनामागे भूमिका आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लॅब सुरू करण्यात येतील. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात येईल.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे म्हणाले, पुढील काळातील आव्हाने पेलण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी तयार करावेत. जिल्हा परिषद सदस्य रोहित , शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांचीही भाषणे झाली.या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, महिला आरोग्य विभागाच्या सभापती राणी शेळके, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, मीनाक्षी तावरे, रोहिणी तावरे, भारत गावडे आदी उपस्थित होते....पुनर्जन्म नसतो, हे सगळ बकवासजीवनात यशस्वी किंवा उद्ध्वस्त होण्यासाठी मित्रांची भूमिका कारणीभूत ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले मित्र निवडावेत. वाईट गोष्टी, व्यसनांपासून दूर राहा. फिट राहावे. पुनर्जन्म नसतो, हे सगळे बकवास आहे. एकदा वर गेले की वरच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेले आयुष्य चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी जगावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
...तर पुण्याचे मॉडेल राज्याला वापरावे लागेल : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 3:20 AM