पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यातील पाण्याची पातळी खालावलेली आहे. १४ जून उजाडला, तरी अजून मॉन्सूनचे आगमन झालेले नाही, त्यामुळे येत्या ३० जून पर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास, शहराच्या पाण्यात आणखी कपात करून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मॉन्सूनचे आगमन आणखी ७ दिवस होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पाणीपुरवठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी हवामान विभागाचे संचालक मुख्योपाध्याय यांची भेट घेतली. आगामी काळात मॉन्सूनची स्थिती काय असणार आहे, याची माहिती महापौरांनी जाणून घेतली. मॉन्सून सक्रिय होण्यास आणखी ७ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यानंतर महापौरांनी पाटबंधारे विभाग व पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाण्याची परिस्थिती जाणून घेतली. या वेळी येत्या ३० जूनपर्यंत शहराच्या पाणीकपातीमध्ये कोणतीही वाढ करायची नाही; मात्र ३० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास, त्याचा पुन्हा एकदा आढावा घेऊन १ जुलैपासून शहराच्या पाणीकपातीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर, सलग १५-२० दिवस पाऊस झाल्यानंतरच धरणांमध्ये पाण्याचा साठा होण्यास सुरुवात होते. तोपर्यंत पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरपण्याचे प्रमाण मोठे असते. राज्यामध्ये मॉन्सूस सक्रिय होण्यास आणखी ७ दिवस लागणार आहेत, त्यानंतर पुढील २० दिवस पाणी साठण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे ३० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास पाणीकपातीचा फेरआढावा घ्यावा लागणार आहे. पावसाची परिस्थिती चिंता वाढविणारी आहे.’’शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी धरणसाठ्यांमध्ये असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये सांगितले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा १५ जुलै पर्यंत पाणीपुरवठा होऊ शकेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शहराच्या पाणीकपातीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट करून, पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंड, इंदापूरसाठी पाणी सोडले होते. (प्रतिनिधी)
पाऊस आला नाही, तर दोन दिवसांनी पाणी
By admin | Published: June 15, 2016 5:28 AM