राज ठाकरेंची सभा पुण्यात झाल्यास आनंदच ; काॅंग्रेस नेत्यांची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 08:08 PM2019-04-07T20:08:33+5:302019-04-07T20:11:12+5:30
‘ठाकरे यांची सभा पुण्यात झाल्यास आनंदच होईल,’ ही भुमिका ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी रविवारी मांडली.
पुणे : मनसे अध्यक्ष राज्य ठाकरे यांची सभा पुण्यात व्हावी, अशी इच्छा आता कॉंग्रेसचे नेतेही व्यक्त करू लागले आहे. ‘ठाकरे यांची सभा पुण्यात झाल्यास आनंदच होईल,’ ही भुमिका ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी रविवारी मांडली. तसेच चंद्रकांत पाटील हे विनोद करण्यात प्रसिध्द असल्याची टीका पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
ठाकरे यांच्या मुंबईतील सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला काँग्रेस भवनही अपवाद नाही. सभेला झालेली गर्दी तसेच ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सभेत त्यांनी राज्यभरात ९-१० सभा घेण्याचे जाहीर केले आहे. मावळमध्येही त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभुमीवर उल्हास पवार यांना ठाकरे यांनी पुण्यात सभा घेण्याची मागणी करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरे यांनी त्यांची स्वतंत्र भुमिका घेतली आहे. त्यांचे दौरे त्यांनी स्वेच्छेने ठरविले आहे. ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात सभा घेणार नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मतदारसंघातही त्यांच्या सभा होतील. त्यामुळे त्यांनी पुण्यातही सभा घेतली तर आनंद होईल.
‘काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी हे रोज सकाळी गिरीष बापट यांच्या घरी चहा पिऊन प्रचाराला जातात’, या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर पवार यांनी त्यांची ‘विनोदी’ म्हणून खिल्ली उडवली. पाटील हे रोज सकाळी पुण्यात येऊन मग कोल्हापुरला जात असावेत. विनोदी वक्तव्य करण्यात ते प्रसिध्द आहेत. लोकशाहीमध्ये वैयक्तिक मैत्री असणे वावगे नाही. पण आपल्या विचारांंशी निष्ठा ठेऊन पक्षासाठी काम करणे हे कर्तव्य असते. मोहन जोशी हे अनेक वर्षांपासून ही निष्ठा ठेऊन काम करत आहेत, असे पवार म्हणाले. शहानवाज हुसेन यांनी ६०० कलाकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी निषेध केला. कला, साहित्याबद्दल त्यांची विकृत मनोवृत्ती यातून दिसून येते. यापुर्वी नयनतारा सहगल, पुरस्कार वापसीबाबतही त्यांची भुमिका स्पष्टपणे दिसली आहे. विचारस्वातंत्र्यावर घाला घालणारे हे सरकार आहे, अशी टाका पवार यांनी केली.